News Flash

हिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदू उमदेवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे असं वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या 2019 निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंदिरांना भेट देत असताना गुलाम नबी आझाद यांचं हे वक्तव्य आलं आहे.

याआधी काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आपण मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत नाही आहोत, कारण आपण प्रचार केला की काँग्रेसला मतं मिळत नाहीत असं वक्तव्य केलं होतं.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे की, ‘युथ काँग्रेसच्या दिवसांपासून मी अंदमान निकोबारपासून ते लक्षद्वीपपर्यंत देशभरात प्रचार करत आहे. मला प्रचाराला बोलावणारे 95 टक्के लोक हिंदू होते. मात्र गेल्या चार वर्षांत हा आकडा खाली घसरला असून 95 वरुन 20 टक्क्यांवर आला आहे’.

‘याचा अर्थ काहीतरी चुकीचं घडत आहे. आज मला लोक प्रचारासाठी बोलवण्यास घाबरत आहेत कारण त्यांना याचा मतांवर परिणाम होण्याची भीती आहे’, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजपा) गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांनी हिंदूंचा अपमान केला असल्याची टीका केली आहे.

हा हिंदू समाजाचा अपमान आहे असं भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. सुब्रहमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे की, ‘हीच काँग्रेस पक्षाची खरी समस्या आहे. त्यांनीच हिंदू दहशतवाद निर्माण केला आणि आता त्यांचं प्रचारतंत्र त्यांच्यावरच उलटलं आहे’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 9:28 am

Web Title: hindu candidates stopped calling me for campaign says ghulam nabi azad
Next Stories
1 शबरीमाला मंदिरात इतिहास घडणार? दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात
2 भारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती
3 रामाणींवरील खटल्याची सुनावणी ३१ ला
Just Now!
X