मॉब लिंचिंग (झुंडबळी) आणि गोरक्षेच्या नावाखाली हिंदू धर्म बदनाम करण्याचा कट रचला जातो आहे असा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. मथुरा या ठिकाणी भागवत वात्सल्य ग्राम कार्यक्रमात ते बोलत होते. देशभरात हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचा कट रचला जातो आहे असा गंभीर आरोप भागवत यांनी केला. देशातल्या काही भागांमध्ये मॉब लिंचिंग केलं जातं आहे समाजात सरकारविषयीचा द्वेष पसरवला जातो आहे. तर काही भागांमध्ये गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार सुरु आहे. अशावेळी संघ प्रचारकांनी दक्ष राहण्याची गरज आहे असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी विविध मतं, पंथ असलेल्यांनी एकत्र यावं आणि जातीभेदाच्या भिंती पाडाव्यात. जेणेकरुन समाजातले जातीभेद नष्ट होण्यास मदत होईल. असं करताना काही समस्यांचा सामना करावा लागेल. मात्र त्यानंतरच आपण एक आदर्श समाज निर्मिती करु शकू असेही भागवत यांनी म्हटले आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही मोहन भागवत यांनी हिंदू धर्म हा सर्वसमावेशक असल्याचं म्हटलं होतं. हिंदू धर्म सगळ्यांना एकसंध ठेवण्याची शिकवण देतो. आरएसएसच्या विचारधारेनुसार हिंदू धर्मात कधीही कुणालाही विरोध केला जात नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. न्यूज १८ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत हिंदी सिनेसृष्टीतल्या ४९ सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या घटना थांबवण्याची आणि यातल्या दोषींना शिक्षा देण्याची विनंती केली होती. तर या पत्रानंतर इतर ६२ सेलिब्रिटींना या पत्राला उत्तर देत हे पत्र वास्तवाशी ताळमेळ असणारे नाही असे म्हटले होते. जय श्रीरामच्या घोषणा देण्याची सक्ती करुन जमावाकडून मारहाणीच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. तर गोरक्षेच्या नावावरुनही हिंसा वाढते आहे. मात्र मथुरा या ठिकाणी बोलतना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटना आणि गोरक्षेवरुन होणारी हिंसा म्हणजे हिंदू धर्म बदनाम करण्यासाठीचा कट आहे असे म्हटले आहे.