तुम्ही आणि तुमच्या समर्थकांनी आम आदमी पक्षात (आप) पक्षश्रेष्ठी आणि हायकमांडची संस्कृती आणल्याचे खडे बोल प्रशांत भूषण  यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्राद्वारे सुनावले आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून ‘आप’च्या राष्ट्रीय निरीक्षकपदावरून प्रशांत भूषण यांची अन्य तीन नेत्यांसह हकालपट्टी करण्यात आली होती. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 

‘आप’चे नेते आशुतोष यांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण  यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर आता प्रशांत भुषण यांनीदेखील त्यांच्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी पत्राचा मार्ग निवडला आहे. २८ मार्च रोजी दिल्लीतील ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गदारोळ झाला होता. या बैठकीत झालेल्या गुंडगिरीबद्दल प्रशांत भूषण यांनी पत्रात मोठ्याप्रमाणावर रोष व्यक्त केला आहे. रशियातील स्टॅलिनची राजवट असतानाची परिस्थिती आणि सध्या ‘आप’मध्ये जे काही घडत आहे, ते समजून घ्यायचे असेल तर तुम्ही जॉर्ज ऑरवेलचे ‘अॅनिमल फार्म’ हे पुस्तक वाचले पाहिजे. तुम्ही आमच्या पक्षाचे जे काही करून ठेवले आहे, त्यासाठी देव आणि इतिहास तुम्हाला (केजरीवाल) कधीही माफ करणार नाही. पुढील पाच वर्षे दिल्लीचा कारभार चालवून सगळे काही बरोबर होईल, असे तुम्हाला वाटते. काँग्रेस, भाजप हे पक्षदेखील असाच विचार करतात. परंतु, आपण ज्या स्वच्छ , तत्वनिष्ठ राजकारणाला आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाला समोर ठेवून सुरूवात केली होती, ते स्वप्न खूप मोठे असल्याचे प्रशांत भूषण  यांनी पत्रात म्हटले आहे.