News Flash

पुलवामासारख्या हल्ल्याचा ‘हिज्बुल’चाही प्रयत्न?

आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी या हेतूने हिज्बुलने हा प्रयत्न केला

संग्रहित छायाचित्र

बनिहालमध्ये ‘सीआरपीएफ’विरोधात कट

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बनीहालमध्ये ३० मार्च रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, पण तो फसला. हल्ल्याचा हा अयशस्वी प्रयत्न हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने केला होता, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासामधून समोर आले आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनकडून बनीहालमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर कार बॉम्बने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

जैश-ए-मोहम्मदप्रमाणे हिज्बुलने असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे  वृत्त या बाबतच्या तपासाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. जैश-ए-मोहम्मदने  फेब्रुवारी महिन्यात पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकावले होते. त्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.

सदर हल्ला यशस्वी झाला असता तर पाकिस्तानमध्ये राहणारा हिज्बुलचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याचे त्या देशात कौतुक झाले असते, असे या दहशतवाद्यांनी सांगितले. सीआरपीएफचा ताफा जम्मूकडे रवाना झाला, त्या वेळी सकाळी १० वाजता स्फोटकांनी भरलेली गाडी बसला धडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

प्रसिद्धीसाठी प्रयत्न

आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी या हेतूने हिज्बुलने हा प्रयत्न केला. हिलाल मोहम्मद मंतू, उमर शरीफ, अकीब शाह, शाहीद वानी आणि वासीम अहमद दार या दहशतवाद्यांच्या चौकशीतून एनआयएला कटाची माहिती मिळाली होती. जैशने पुलवामामध्ये केले त्याप्रमाणे मोठे हल्ले करण्याची गरज आहे, या विचारातून अशा प्रकारचा हल्ला करण्याचे आदेश हिज्बुलच्या म्होरक्याने दिले होते.

अमेरिकेने दहशतवादी गटांचा निधी गोठवला

वॉशिंग्टन : पाकिस्तानातील दहशतवादी गटांसह अन्य दहशतवाद गटांचा, दहशतवाद्यांचा कोटय़वधींचा निधी अमेरिकेने गोठवला आहे, अशी माहिती अमेरिकेच्या अर्थखात्याने जाहीर केलेल्या अहवालात दिली आहे.

या अहवालानुसार अमेरिकेच्या अर्थखात्याने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे ४ लाख अमेरिकन डॉलर, तर जैश-ए-मोहंमदचे १,७२५ डॉलर गोठवले आहेत. अर्थखात्यातील परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. या खात्यातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट, दहशतवादाला पाठिंबा देणारे देश यांची मालमत्ता गोठवण्याची अंमलबजावणी केली जाते.

२०१८ मध्ये अमेरिकेने दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचे ४६.१ दशलक्ष डॉलर गोठवले आहेत. २०१७ मध्ये ४३.६ दशलक्ष डॉलर गोठवण्यात आले होते. त्या तुलनेत २०१८ मध्ये २.५ दशलक्ष डॉलर अधिक गोठवण्यात आल्याचे अहवालातून स्पष्ट होते. यावर्षी हरकत-उल-मुजाहिद्दीनचे ११,९८८ डॉलर, हिज्बुल मुजाहिद्दीनचे २,२८७ डॉलर गोठवण्यात आले. लष्कर ए जांघवीचे १०,९६२ डॉलर गोठवले आहेत. लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम (एलटीटीई) या श्रीलंकेतील संघटनेचे ५ लाख डॉलर गोठवले असून गेल्यावर्षीही एवढीच रक्कम गोठवण्यात आली होती. गोठवण्यात आलेली सर्वाधिक ६.४ दशलक्ष डॉलर एवढी रक्कम अल-काइदा या संघटनेची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 3:38 am

Web Title: hizbul militant attempt to replicate pulwama attack
Next Stories
1 जेटली, स्वराज आणि उमा भारती नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नाहीत
2 ‘मोदी सरकार-२’ : एका क्लिकवर मंत्र्यांची यादी
3 मोदींच्या मंत्रिमंडळात सात मराठी चेहरे!, शिवसेनाला फक्त एक मंत्रीपद
Just Now!
X