गुजरातच्या अहमदाबादमध्ये ऑनलाइन डिलिव्हरीसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. चलनातील नोटांमुळे करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ऑनलाइन डिलिव्हरीसाठी कॅश व्यवहारावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅश व्यवहार न करता फक्त डिजिटल पेमेंट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अहमदाबाद महापालिकेने सोमवारी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. चलनातील नोटांमुळे करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी अहमदाबाद महापालिकेने कॅश ऑन डिलिव्हरीवर बंदी घातली. सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अॅपही बंधनकारक करण्यात आले आहे. डी मार्ट, बिग बास्केट, बिग बाजार, ओसिया हायपरमार्केट, झोमॅटो, स्वीगी या होम डिलिव्हरी करणाऱ्या मुख्य कंपन्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिकेने नमूद केलंय. कर्मचाऱ्यांच्या 100 टक्के स्क्रिनिंगनंतरच होम डिलिव्हरीची परवानगी दिली जाईल, असेही महापालिकेने म्हटले आहे.

होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सॅनिटाइझर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अहमदाबाद महापालिकेअंतर्गत येणाऱ्या भाजी, दूध, फळ आणि किराणा अशा जवळपास 17000 दुकानांसाठी हा नियम लागू असेल. गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरात करोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे तिथे सध्या होम डिलिव्हरीवरही बंदी आहे. 15 मेपासून शहरात होम डिलिव्हरीला सुरूवात होईल, तेव्हापासून हा नियम लागू असेल.