केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्हे ‘अशांत’ घोषित करुन तिथे आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवल अॅक्ट (अफस्पा) लागू केला आहे. गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबत अधिसूचना जारी केली. तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्हे अशांत असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. अरुणाचलमध्ये आसाम सीमेपासून सुमारे ८ पोलीस ठाण्याअंतर्गत येणारा काही परिसरही अशांत घोषित करण्यात आला आहे.

अधिसूचनेत म्हटले आहे की, तिरप, चांगलांग, लोंगडिंग जिल्हा आणि आसाम सीमेजवळील ८ पोलीस ठाण्यातील परिसर अशांत घोषित करण्यात आला आहे. तिथे अफस्पा अॅक्ट, १९५८ च्या कलम ३ अंतर्गत मिळणाऱ्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकारने या परिसरात ३१ मार्च २०१९ पर्यंत अफस्पा लागू असेल. १ ऑक्टोबर २०१९ पासून हे लागू मानले जाईल.

तत्पूर्वी आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी ३० ऑगस्टला राज्यातील अफस्पा पुढील सहा महिन्यासाठी वाढवला होता.

अफस्पा अंतर्गत अशांत क्षेत्रातील सुरक्षादलांना विशेष अधिकारी दिले जातात. या अॅक्ट अंतर्गत सशस्त्र दलांना झडती घेणे, अटक करणे आणि बळाचा वापर करण्यासारखे अधिकार मिळतात.