उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबेचा खात्मा केल्याबद्दल शहीद पोलीस पत्नीने आनंद व्यक्त केला आहे. मात्र त्याचबरोबर आता दुबेचा खात्मा झाल्याने त्याच्यावर कोणाला वरदहस्त होता हे समजणार नाही याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कानपूरमध्ये २ जुलै रोजी शहीद झालेल्या पोलिसाच्या पत्नीने दुबेकडून आणखीन माहिती मिळाली असती असं मत व्यक्त केलं आहे.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे आज सकाळी (१० जुलै २०२० रोजी) पोलीस चकमकीत ठार झाला आहे. २ जुलै रोजी विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये आठ पोलिसांचा मृत्यू झाला होता. यानंतर विकास दुबे फरार झाला होता. तेव्हापासून विकास दुबेचा शोध घेतला जात होता. तीन राज्यांचे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर गुरुवारी विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या असून विकास दुबे ठार झाला. या चकमकीसंदर्भात आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. विरोधकांबरोबरच शहीद झालेल्या आठ पोलिसांच्या नातेवाईकांनाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“मी समाधानी आहे. मात्र आता त्याला (विकास दुबेला) पाठींबा देणारे कोण आहेत हे कसं समोर येणार? त्याची चौकशी झाली असती तर ही माहिती मिळाली असती,” असं मत बिकरू गावत दुबेच्या गुंडांनी केलेल्या गोळीबारामध्ये शहीद झालेले पोलीस कर्मचारी सुल्तान सिंग यांच्या पत्नी उर्मिला वर्मा यांनी व्यक्त केलं आहे.

दुबे याच्या एन्काउंटरच्या बातमीनंतर आता विरोधकांनाही दुबेला पाठिंबा देणार कोण आहेत हे आता समजू शकणार नाही असं म्हटलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा टि्वट केले आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.