भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या एक आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यासाठी ह्यूस्टन शहरात दाखल झाले. यावेळी ह्यूस्टन विमानतळावर पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विमानातून उतरताच अमेरिकेचे व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे संचालक ख्रिस्तोफर ऑल्सॉन आणि अन्य अधिकाऱ्यांनी मोदींचं स्वागत केलं. मोदींच्या स्वागतासाठी दोन्ही देशांचे राजदूत देखील उपस्थित होते.

दरम्यान, स्वागतावेळी एका अमेरिकी महिला अधिकाऱ्याने पंतप्रधान मोदींना पुष्पगुच्छ दिला. पण, पुष्पगुच्छ घेताना त्यातून एक फूल खाली पडलं. मोदींनी तो पुष्पगुच्छ मागे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाकडे दिला, मात्र पुढे जाताना त्यांना फूल पडल्याचं लक्षात आल्यामुळे ते खाली वाकले आणि पडलेलं फूल स्वतः उचलून मागील व्यक्तीच्या हातात दिलं. आजूबाजूला इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक आणि अन्य अधिकारी असतानाही मोदींनी स्वतः फूल उचलण्याची ही कृती नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. त्यांच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून मुक्तकंठाने कौतुक होत असून वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेला हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला सुरूवात झाली आहे. अनेकांनी मोदींची प्रशंसा करताना भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेत देखील स्वच्छता अभियान सुरू ठेवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी, ‘ही कृती म्हणजे, आमच्या पंतप्रधानांचा जमिनीशी नाळ जोडणारा स्वभाव सिद्ध करते. ते प्रोटोकॉलचाही विचार करत नाहीत’, असं म्हटलं आहे.

 

ह्यूस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’कडून आज ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याची जय्यत तयारी सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला ५० हजारांपेक्षा अधिक अमेरिकी-भारतीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत होणाऱ्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे.  ह्यूस्टनमधील एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये ही सभा होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.  नरेंद्र मोदींचा दौरा २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. तसंच याशिवाय न्यूयॉर्क येथे अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमनच नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींच्या नंतर काही वेळाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानदेखील बोलणार आहेत.