पाकिस्तानात मानवी हक्कांचे सर्रास उल्लंघन होत असून त्याचे तुकडे होऊ शकतात, शिवाय त्या देशाने १९६५ व १९७१ मध्ये ज्या चुका केल्या त्याची पुनरावृत्ती करण्याचे टाळावे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येथे दिला.

कलम ३७० रद्द करण्याबाबत आयोजित जनजागरण सभेत त्यांनी सांगितले, की कलम ३७० हे कर्करोगासारखे  काश्मीरला घातक ठरत होते. त्यामुळे ते रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला.भाजपने कलम ३७० बाबत क धीच सौम्य भूमिका घेतलेली नव्हती व हे कलम रद्द करून भाजपने प्रामाणिकपणा व विश्वासार्हतेचे दर्शन घडवले आहे.

पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करू नयेत,यापुढे दहशतवाद थांबवल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा केली जाणार नाही. जम्मू काश्मीर हा भारताचा एकात्म भाग आहे व आता यापुढे चर्चा झाली तर ती पाकव्याप्त काश्मीरबाबत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही कलम ३७० बाबत भूमिका मांडली.