मध्य प्रदेशमध्ये सध्या माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी इमरती देवी यांना आयटम असे संबोधल्यावरून मोठा राजकीय वाद सुरू आहे. भाजपाने हा मुद्दा लावून धरत कमलनाथ यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची सोनिया गांधींकडे मागणी केली आहे. शिवाय, या मुद्यावरून काँग्रेसवर टीका देखील केली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मौन सोडलं आहे.

”कमलनाथ हे माझ्या पक्षाचे आहेत, परंतु वैयक्तिकदृष्ट्या मला त्यांनी वापरलेली भाषा अजिबात आवडलेली नाही. मी त्याचे समर्थन करत नाही, मग ते कोणीही असो. हे दुर्देवी आहे.” असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या अगोदर आज सकाळी कमलनाथ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. “जर आपलं वक्तव्य कोणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर आपण माफी मागत असल्याचं,” ते म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, “जर कोणालाही माझं वक्तव्य अनादर करणारं वाटलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो” असं ते म्हणाले.

आणखी वाचा- सरळ सरळ माफी का मागत नाहीत; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सवाल

“भाजपाला आपला पराभव होणार असल्याची जाणीव झाली आहे. यामुळेच मूळ मुद्द्यांवरुन जनतेला भरकटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते बोलू देत, मी त्यांना यश मिळू देणार नाही,” असं देखील कमलनाथ यांनी म्हटलं आहे.  पुढे ते म्हणाले की, “ते म्हणतात मी अनादर करणारं वक्तव्य केलं…कोणतं वक्तव्य? पण जर कोणाला तसं वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”. असं देखील त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- कमलनाथ यांनी ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

दरम्यान, या विधानावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र देखील लिहिलं असून, त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेलं नाही, शिवराज सिंह म्हणाले. “अजूनही तुम्हाला (कमलनाथ) इमरती देवी यांचं नाव आठवलेलं नाही. २४ तासांत पूर्ण देशानं इमरती देवींना बघितलं. त्या तुमच्या मंत्रिमंडळात होत्या. सरळ सरळ माफी का मागत नाहीत? आणि आयटमचं स्पष्टीकरण देत आहेत. मी काल सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं. त्याचं उत्तर मला मिळालेलं नाही. हा अहंकार आहे. ते (कमलनाथ) स्वतःपेक्षा कुणालाही मोठं समजत नाहीत आणि याच कारणामुळे त्यांचं सरकार कोसळलं. कारण त्यांनी राज्यालाच उद्ध्वस्त केलं होतं,” अशी टीका चौहान यांनी केली आहे.