करोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. तर, लसीवरून राजकीय वादंग देखील सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून कोव्हॅक्सिनबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. असे असताना आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील लस संदर्भात एक निर्णय जाहीर केला आहे. मी आताच लस टोचवून घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. तर, असा निर्णय घेण्यामागचं नेमकं काय कारण आहे? हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

“करोना लसीकरणासंदर्भात बोलायचं झालं तर त्याची तयारी सर्व ठिकाणी झालेली असेल. मी असा निर्णय घेतला आहे की मी आताच लस टोचवून घेणार नाही. अगोदर बाकीच्यांना लस दिली गेली पाहिजे, त्यानंतर आपला क्रमांक यावा. प्रायॉरिटी ग्रुप्सच्या लसीकरणास अगोदर प्राधान्य दिले जाईल, त्यानंतर माझे लसीकरण होईल.” असे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हा निर्णय अशावेळी घेतला आहे. जेव्हा विरोधीपक्ष लसीकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर, जयराम रमेश यांनी कोव्हॅक्सिनला मान्यात दिल्या गेल्याबद्दल शंका उपस्थित करत, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना उत्तर मागितले आहे.

लसीवरून राजकारण?; काँग्रेस नेत्यांनी ‘कोव्हॅक्सिन’बद्दल उपस्थित केली शंका

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.” असं विधान केलं होतं.

अखिलेश यादव यांचा बदलला सूर!; आता म्हणतात लसीकरणाची तारीख लवकर घोषित व्हावी

तर, त्या पाठोपाठ सपाचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी देखील “कोविड-19 वॅक्सीनमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकतं.” असं असं खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे.