”जर ‘एनपीआर’च वेळापत्रक निश्चित केले जात असेल, तर त्याला विरोध करण्याचे वेळापत्रकही लवकरच निश्चित केलं जाईल.” असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर)वरून पुन्हा एकदा वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून सरकारला इशारा दिला आहे. एनपीआरचं वेळापत्रक निश्चित केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ओवेसींनी हे विधान केलं आहे.

या संदर्भात ओवेसींनी ट्विट केलं असून, त्यामध्ये एनपीआरची लिंक देखील शेअर केली आहे. तर, ”एनपीआर एनआरसीच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल आहे. भारतीताली गरिबांना या प्रक्रियेत मजबूर नाही केलं गेलं पाहिजे. ज्यामुळे त्यांच्याकडे ‘संशयित नागरिक’ म्हणून पाहिलं जाऊ शकेल. जर ‘एनपीआर’च वेळापत्रक निश्चित केले जात असेल, तर त्याला विरोध करण्याचे वेळापत्रकही लवकरच निश्चित केलं जाईल.” असं ओवेसी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

आणखी वाचा- आधी तुघलकी लॉकडाउन लावला, आता…; राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर) म्हणजे काय?

राष्ट्रीय लोकसंख्या सूची ही देशातील नियमित नागरिकांची नोंदणी असते. प्रत्येक नियमित रहिवासी नागरिकाला ही नोंदणी बंधनकारक असून त्यात भारतीय नागरिक व परदेशी नागरिक अशा दोन्हींची नोंदणी होते. एनपीआरचा उद्देश हा देशातील नियमित नागरिकांचा माहिती संच तयार करणे हा असून पहिली राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ही २०१० मध्ये केली होती त्यातील माहितीत नंतर २०१५ मध्ये घरोघरी जाऊन घेतलेल्या नोंदींच्या आधारे सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर आता एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान माहिती अद्ययावत केली जाणार होती. त्यातून २०२१ च्या जनगणनेची पूर्वतयारीही होणार आहे. स्थानिक, उपजिल्हा, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय या पातळ्यांवर नागरिकत्व कायदा १९५५ अनुसार ही माहिती सुधारित केली जाणार आहे. नागरिकत्व नियम २००३ चाही त्याला आधार आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यात काय  फरक आहे?

एनपीआर व एनआरसी हे वेगळे आहेत. एनपीआरमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश नाही.  १० डिसेंबर २००३ मधील नागरिकत्व नियमानुसार लोकसंख्या नोंदणी म्हणजे ग्रामीण किंवा शहरी भागात, प्रभागात राहणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करणे होय. राष्ट्रीय नागरिक  नोंदणी (नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझन्स) म्हणजे एनआरसीत देशातील व देशाबाहेरील भारतीय नागरिकांची माहिती घेतली जाते. एनआरसीमध्ये नागरिकाचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, जन्मठिकाण, निवासी पत्ता (स्थायी व सध्याचा), वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव, ओळख पटवणारी खूण, नोंदणीची तारीख, नोंदणी अनुक्रमांक, राष्ट्रीय ओळख क्रमांक ही माहिती घेतली जाते.