पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी नव्या रणनितीच्या तयारीत आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्याला त्यांनी ‘मॉडेल ऑफ कॉन्फ्लीक्ट रिझॉल्युशन’ असे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली आहे.

पाकिस्तान सरकारच्या मानव हक्क मंत्री शिरीन माझरी यांनी एका टीव्हीवरील शो दरम्यान बोलताना ही माहिती दिली. मात्र, याबाबत त्यांनी अधिक माहिती देणे टाळले. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आठवड्याभरात हा प्रस्ताव आणणार आहोत. त्यानंतर तो सर्व संबंधीतांमध्ये वितरीत करण्यात येईल, तत्पूर्वी तो कॅबिनेट आणि पंतप्रधान खान यांच्यासमोर मांडण्यात येईल, असे माझरी यांनी उर्दु भाषिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

माझरी पुढे म्हणाल्या, या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवणार आहोत. माझरी या पाकिस्तानी लष्कराच्या जवळच्या मानल्या जातात. प्रस्तावाच्या सध्यस्थितीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी तो जवळपास तयार असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर बऱ्याचदा  त्यांचा लष्कराचा विशेष प्रभाव असल्याचे दिसून येते. पाकिस्तानच्या जन्मापासून ७० वर्षांपासून इथल्या लष्करानेच या देशावर आपले वर्चस्व गाजवले आहे.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय झाल्यानंतर इम्रान खान यांनी आपल्या भाषणात भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यावर भर देणार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर चर्चेद्वारे भारतासोबत असलेले काश्मीरच्या कळीच्या मुद्द्यासह सर्व वाद सोडवू असेही म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या सरकारने काश्मीर तोडग्यासाठी आणलेला नवा प्रस्ताव नक्की कसा आहे, याकडे जगाचे लक्ष असेल.