अनंतनाग पोलिसांनी लष्कर ए मुस्तफा या नव्या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली व त्या दोघांची चौकशी केल्यानंतर, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्र व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. त्राल येथे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्य दल, स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पथकांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली होती. त्रालमधील एका परिसरात शोधमोहिम सुरू असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलानेही गोळीबार केला. त्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा पथकाला यश आले.

दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला त्रालमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात आठ स्थानिक आणि एक जवान जखमी झाला होता.