भारतात गुरुवारी रुग्णवाढीचा जागतिक उच्चांक नोंदविण्यात आला. देशात गेल्या २४ तासांमध्ये ७५,७६० रुग्ण आढळले. जगात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या अमेरिकेच्या एका दिवसातील रुग्णवाढीपेक्षा ही संख्या अधिक आहे.
भारतातील करोना रुग्णांची एकूण संख्या ३३ लाख १० हजार २३४ वर पोहोचली. गेल्या २४ तासांमध्ये १०२३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत ६० हजार ४७२ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये ५६ हजार १३ रुग्ण करोनामुक्त झाले. बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा २५ लाख २३ हजार ७७१ वर पोहोचला आहे. उपचाराधीन रुग्ण ७ लाख २५ हजार ९९१ असून, एकूण रुग्णसंख्येत त्यांचे प्रमाण २१.९३ टक्के आहे. मृत्युदर १.८३ टक्क्यांवर आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.२४ टक्के आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ९.२४ लाख करोना चाचण्या झाल्या.
राज्यात १४,७१८ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या १४,७१८ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, ३५५ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकू ण संख्या ७ लाख ३३ हजार झाली असून, आतापर्यंत २३,४४४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख ७८ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. सर्वाधिक ४६,१२४ रुग्ण हे पुणे जिल्ह्य़ातील आहेत.
मुंबईतील बाधितांमध्येही वाढ
मुंबईतील एका दिवसातील करोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून १३५० नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत चोवीस तासांत ३० रुग्णांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार १७२ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख १८ हजार ९११ इतकी झाली. जिल्ह्य़ात दिवसभरात ३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.