News Flash

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी वेगवेगळे मतप्रवाह

लडाख परिसरात गेले काही दिवस घुसखोरीच्या कारवायांसंदर्भात भारतीय लष्करासमवेत सुरू असलेल्या तणावाबद्दल चिनी लष्कराने प्रथमच जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे

| September 23, 2014 01:07 am

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी वेगवेगळे मतप्रवाह

लडाख परिसरात गेले काही दिवस घुसखोरीच्या कारवायांसंदर्भात भारतीय लष्करासमवेत सुरू असलेल्या तणावाबद्दल चिनी लष्कराने प्रथमच जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे मत सोमवारी मांडले. मात्र उभय पक्ष चर्चेच्या माध्यमातून सीमावाद मिटवू शकतील, असेही चीनच्या लष्कराने स्पष्ट केले.
लडाखजवळील चुमार प्रांतात गेल्या आठवडय़ापासून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ चे सैन्य आणि भारतीय फौजांमध्ये सुरू असलेल्या तणावासंदर्भात चीनच्या लष्करी मंत्रालयास विचारणा केली असता या संदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची दखल आम्ही घेतली आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळ सीमा तंटा प्रलंबित असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्यावरूनच मतभेद आहेत, असे या प्रवक्त्याने स्पष्ट केले. उभय देशांनी केलेल्या करारांना अनुसरून सीमेवरील आमचे सैनिक  कोणतीही कसूर न करता, त्यानुसारच वर्तन करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर सीमेसंदर्भात काही मतभेद असतील तर उभय देश चर्चा आणि विचारविनिमय करूनच त्यांचे निराकरण करतील, असेही या प्रवक्त्याने सांगितले. चीन आणि भारतादरम्यानच्या सीमेवर शांतता आणि सलोखा प्रस्थापित करून विकासाच्या क्षेत्रात भरीव भागीदारी करण्यावर  उभय देशांनी भर दिला आहे. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात या मुद्दय़ावर मान्यता देण्यात आली होती, याकडेही या प्रवक्त्याने लक्ष वेधले.
दरम्यान, अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशांमधील संशय दूर झाले असून जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या चर्चेत मैत्रीपूर्ण वातावरणात सीमातंटा सोडविण्यावर महत्त्वपूर्ण मतैक्य झाल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनियांग यांनी दैनंदिन वार्ताहर परिषदेत पक्षकारांना दिली. अध्यक्ष जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध नव्या वातावरणात प्रस्थापित झाले आहेत, असे चुनियांग यांनी सांगितले.
लष्करप्रमुखांचा भूतान दौरा रद्द
पीटीआय, नवी दिल्ली : चिनी सैनिकांनी लडाख प्रांतात केलेल्या घुसखोरीचा मुद्दा अद्यापही पूर्णपणे निकाली न लागल्यामुळे लष्करप्रमुख जन. दलबिरसिंग सुहाग यांनी भूतानचा चार दिवसांचा दौरा सोमवारी रद्द केला. सुहाग हे आता नंतर सोयीस्कर वेळेस भूतान येथे जातील, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.चीनचे सैनिक गेल्या १० दिवसांहून अधिक काळ चुमार परिसरात ठाण मांडून बसलेले असल्यामुळे सुहाग यांनी हा निर्णय घेतला. चुमार परिसरात चिनी सैनिकांनी तंबू उभारले असून त्यांच्यासाठी चिनी हेलिकॉप्टरनी हवाई हद्दीचा भंग करून अन्नाची पाकिटेही टाकल्याचे वृत्त आहे. याखेरीज, काही चिनी कामगारांनी भारताच्या हद्दीत रविवारपासून रस्ते उभारण्यास प्रारंभ केल्यामुळेही तणाव वाढला आहे.
पंतप्रधानांनी निवेदन करावे -काँग्रेस
पीटीआय, नवी दिल्ली : लडाख परिसरात चिनी सैनिकांनी वारंवार केलेल्या घुसखोरीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. या कदापिही स्वीकारार्ह नसलेल्या घडामोडीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट निवेदन करावे तसेच चीनच्या अध्यक्षांकडे आपला निषेध स्पष्टपणे नोंदवावा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
अशा प्रकारच्या घुसखोरीच्या घटना देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि परराष्ट्र धोरणाच्या विरोधात असून ते कधीही मान्य होणार नाही, असे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 1:07 am

Web Title: india and china has differences of opinion over line of actual control
टॅग : Chinese Troops
Next Stories
1 प्रेमी युगुलांना एकत्र आणण्यासाठी ‘लव्ह कमांडोज’ चा आधार
2 नासाचे ‘मावेन’ यान मंगळाच्या कक्षेत
3 सीबीआय संचालकांवरील आरोपांची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालय राजी
Just Now!
X