देशात करोना लशींचा तुटवडा असला तरी भारताने लसीकरण मोहिमेत अमेरिकेला मागे सोडलं आहे. अमेरिकेपेक्षा भारतात सर्वाधिक नागरिकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यासाठी निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी जागतिक आकडेवारीचा दाखला दिला. या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या तुलनेत भारतात करोना लसीचा पहिला डोस सर्वाधिक नागरिकांनी घेतला आहे. त्याचबरोबर भारतातील लसीकरणाची आकडेवारी त्यांनी जाहीर केली. देशात ४ जूनपर्यंत १७.८५ कोटी लोकांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस ४.५६ कोटी लोकांनी घेतला असून आतापर्यंत एकूण २२.४१ कोटी डोस दिले गेले आहेत. लसीरकरण मोहिमेंतर्गत ६० वर्षांवरील ४३ टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

“जागतिक आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत १७.२ कोटी लोकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर अमेरिकेत हीच संख्या १६.९ कोटी इतकी आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार भारतानं अमेरिकेला मागे सोडलं आहे”, असं निती आयोगाचे सदस्य व्ही. के पोल यांनी सांगितलं.

या अहवालात चीनची आकडेवारी नाही. तर इंग्लंडमध्ये ३.९ कोटी लोकांनी, तर जर्मनीत ३.८ कोटी लोकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित!

देशात करोना रुग्णांच्या संख्येत घट

देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असल्याने दिलासादायक चित्र आहे. देशातील रिकव्हरी रेट ९३.१ टक्क्यांवर पोहोचला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशातील ३७७ जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ३६४ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २,७१३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ लाख ७ हजार ७१ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. सलग २२व्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. याआधी बुधवारी एक लाख ३४ हजार १५४ करोनाबाधितांची नोंद झाली होती तर २,८८७ रुग्णांचा मृत्यू झाला होता.