नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचे इस्लामाबादमध्ये झालेले अपहरण ही ‘अतिशय धक्कादायक’ घटना असून, पाकिस्तानने ही घटना नाकारून नव्याने खालची पातळी गाठली आहे, असे भारताने गुरुवारी सांगितले.
अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्ला अलिखिल यांची २६ वर्षांची मुलगी सिलसिला अलिखिल हिचे अज्ञातांनी गेल्या शुक्रवारी इस्लामाबादमध्ये अपहरण करून तिला अनेक तास ओलीस ठेवले होते.
‘ही अतिशय धक्कादायक घटना आहे’, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे प्रकरण अफगाणिस्तान व पाकिस्तानशी संबंधित आहे. तथापि, पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्र्यांनी भारताला यात ओढल्यामुळे, पाकिस्तानने संबंधित तरुणीचे म्हणणेच नाकारून नवी खालची पातळी गाठली आहे एवढेच मी म्हणू शकेल, असेही बागची यांनी नमूद केले. अलिखिलचे अपहरण करण्यात आलेले नाही या पोलिसांच्या दाव्याचा मंगळवारी पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी पुनरुच्चार केला.