भारतीय अमेरिकी व्यक्तींना अमेरिकेत अनेक वेळा सापत्नभावाच्या वागणुकीला सामोरे जावे लागते किंवा वेगळे पाडल्याचे अनुभव येतात, असे एका पाहणीत दिसून आले आहे.

‘सोशल रिअ‍ॅलिटिज ऑफ इंडियन अमेरिकन्स अ‍ॅटीट्यूड सर्व्हे’मध्ये म्हटले आहे, की १२०० भारतीय अमेरिकी लोकांची ऑनलाइन पाहणी करण्यात आली. २०२० मध्ये कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस, जॉन हॉपकिन्स, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनिया यांनी हा अहवाल तयार केला आहे. १ ते २० सप्टेंबर २०२० या काळातील हा पाहणी अहवाल आहे. ‘युगव्ह’ या आस्थापनेचाही या पाहणीत समावेश होता.

अहवालात म्हटल्यानुसार भारतीय अमेरिकी लोकांना नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळते. दोन भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी एकाला तरी एक वर्षात सापत्नभावाच्या वागणुकीला तोंड द्यावे लागते. अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय अमेरिकी व्यक्तींना अशा प्रकारांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते. परदेशात जन्मलेल्या भारतीय व्यक्तींना फारसे अशा प्रकारांना सामोरे जावे लागत नाही. भारतीय अमेरिकी लोकांमध्ये विवाह आपल्याच समुदायात करण्याचे प्रमाण जास्त आहे. दहा पैकी आठ जणांचे जोडीदार हे भारतीय वंशाचे आहेत.

पाहणीतील निष्कर्ष

  • अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय अमेरिकी व्यक्तींमध्ये तेथेच जन्मलेल्या भारतीय व्यक्तींना जोडीदार निवडण्याचे प्रमाण चारपट अधिक आहे.
  • भारतीय अमेरिकी लोकांमध्ये धर्माचा प्रभावही जास्त आहे, पण त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. तीन चतुर्थांश लोकांमध्ये जीवनात धर्माला महत्त्व अधिक आहे.
  • चाळीस टक्के लोक दिवसातून एकदा तरी प्रार्थना करतात, तर २७ टक्के लोक आठवड्यातून एकदा तरी धार्मिक स्वरूपाची कृत्ये करतात.
  • भारतीय अमेरिकी लोकांपैकी निम्मे लोक जातीने ओळखले जातात.