काही दिवसांपूर्वीच लष्कराने आपल्या जवानांसाठी व्हॉट्सअॅपबाबत आदेश जारी केला होता. यामध्ये जवानांना व्हॉट्सअॅपवर खुल्या ग्रुपमध्ये सहभागी न होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 9 जुलै रोजी लष्कराने आपल्या जवानांना एक अॅडव्हायझरी जारी केली होती. लष्कराने असे आदेश का दिले याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या एका अहवातून समोर आले आहे. काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे महत्त्वाची माहिती बाहेर आल्यामुळे लष्कराला कठोर पावले उचलावी लागल्याचे सांगण्यात आले आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या अहवालानुसार, ब्रिगेडियर-रँकच्या एका अधिकाऱ्याने व्हॉट्सअॅपचा उपयोग ब्रिगेड मुख्यालयात सर्व निर्णायक, रणनीतिक माहितीसह नकाशा पाठविण्यासाठी केला. त्यानंतर मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने पुन्हा व्हाट्सअॅपचा वापर त्याच नकाशाला इतर अधिकाऱ्यांना पाठविण्यास केला. दरम्यान, यानंतर अत्यंत संवेदनशील आणि खासगी कागदपत्रे सार्वजनिकरित्या बाहेर आली होती. यानंतर लष्कराने कठोर पावले उचलत व्हॉट्सअॅपच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला. कोणताही लष्करी कर्मचारी इंटरनेट आधारित मेसेंजर, चॅट आणि ईमेल सेवांवर कोणत्याही मोठ्या गटाचा भाग असणार नाहीत. काही ठराविक ग्रुपमध्ये म्हणजेच ज्या ग्रुपमधील मेंमर्सची माहिती किंवा त्यांच्या पदांची माहिती मिळू शकते अशा ठिकाणी एकमेकांना मेसेज करण्याची मुभा देण्यात आली आहे.

लष्करातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोशल मीडियाच्या वापरासाठी पूर्वीपासूनच काही नियमावली देण्यात आली आहे. परंतु काही तांत्रिक बदल आणि विकसित पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर दिशानिर्देशांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच ही नवीन ऑर्डर क्लासिफाइड माहितीची सुरक्षा कायम ठेवण्यासाठी जारी करण्यात आली होती. त्यामागे हा एकमेव उद्देश होता, असे एका अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. अधिकृत माहितीच्या देवाणघेवाणीसाठी वैयक्तिक आयटी डिव्हायसेस, विशेषत: स्मार्टफोन आणि व्हॉट्सअॅपसह इतर मेसेजिंग सेवांचा वापर माहितीच्या चोरीचा प्राथमिक स्रोत म्हणून ओळखला गेला असल्याचे ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आले आहे. लष्करी अधिकाऱ्यांसाठी व्हॉट्सएपचा वापर वर्गीकृत माहिती, कागदपत्रे आणि सादरीकरण पाठविण्यासाठी सामान्य झाला आहे. परंतु ते गोपनियतेसंबधिच्या कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचेही अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.

जरी डेटा इनक्रिप्ट होत असला आणि ट्रान्समिशन दरम्यान तो सुरक्षित असल्याचे मानले जात असले तरी मोबाईल किंवा अन्य डिव्हाइसेसबाबत शाश्वती देता येणार नाही. अनेक स्पायिंग सॉफ्टवेअर आणि अॅप्ससह महत्त्वाची आणि गोपनीय माहिती बाहेर आल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या असल्याचे अधिकाऱ्याने बोलताना सांगितले. सध्याची आव्हाने ही व्हॉट्सअॅपच्याही पलिकडे जाणारी आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या वापरावरील आदेश हा या समस्येवरील उपाय नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.