लडाखमधील भारत चीन सीमेवरून गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. चीनचं वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनं पुन्हा एकदा लेखातून भारताविषयी गरळ ओकली आहे. काही भारतीय तज्ज्ञ वन चायना प्रिन्सिपलवर भारताला पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला देत आहेत. यामध्ये भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अरविंद गुप्ता यांचाही समावेश असल्याचं यात सांगण्यात आलं आहे.

जेव्हा चीनचे नेता भारताच्या दौऱ्यावर येतील तेव्हा भारतानं हाँगकाँगमध्ये लोकशाही, तैवानसोबत आर्थिक आणि तंत्रज्ञान साहाय्य आणि तेबटच्या लोकांबरोबर विरोध करण्याची कल्पना गुप्ता यांनी दिली आहे. हाँगकाँग आणि तैवानला सदस्य बनवल्याखेरीज प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक सहभागास नकार द्यावा असेही भारतीय तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचं ग्लोबल टाइम्सनं म्हटलं आहे. दरम्यान, या तज्ज्ञांकडे धोरणात्मक दृष्टी नसते, असा दावाही लेखात करण्यात आला आहे. तसंच उदाहरणार्थ, ‘वन चीन प्रिन्सिपल’चा आंतरराष्ट्रीय समुदायाद्वारे व्यापकपणे स्वीकार केला जातो आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनशी राजकीय संबंध प्रस्थापित करण्याचीही अट आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- भारत-चीन चकमक: लडाखच्या गलवान खोऱ्यात काल रात्री काय घडलं?

आगीशी न खेळण्याच्या इशारा

चिनी वृत्तपत्राने असा दावा केला आहे की, काही भारतीय तज्ज्ञ आणि प्रसारमाध्यमं ही अट तोडू इच्छित आहेत. हे लोक खरोखर चीनला आव्हान देत असून चीनला आगीशी खेळण्याचं सुचवत आहेत. त्यांनी प्रादेशिक अखंडता टिकवून ठेवण्याच्या चीनच्या निर्णयाला कमी लेखले आहे. त्यांना चीनच्या मुख्य हितसंबंधांचा धोका पोहोचवू इच्छित आहे, परंतु त्यांच्या भ्रामक मतांचा भारत सरकारच्या ‘वन चीन प्रिन्सिपल’च्या मतांवरील मान्यतेवर परिणाम होण्याची शक्यता नाही, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

आणखी वाचा- लडाख सीमेवर पुन्हा चकमक, संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्य दलप्रमुखांसोबत तातडीची बैठक

चीनला भडकावणं योग्य नाही

ग्लोबल टाईम्सने असा दावा केला आहे की, १९५० च्या सुरूवातीला जेव्हा दोन्ही देशांनी रादयी संबंध प्रस्थापित केले तेव्हाच ‘वन चीन प्रिन्सिपल’ला मान्यता दिली होती. ‘वन चीन प्रिन्सिपल’ला आव्हान देऊन चीनला चिथावणी देणं योग्य होणार नाही. हे भारतासाठीच त्रासदायक ठरणार आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढतील अशा नकारात्मक भावनांना दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये येऊ देऊ नये, असंही ग्लोबल टाइम्सनं म्हटलं आहे.