पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावरील दहशतवादी हल्ल्यात ४० जवान मृत्युमुखी पडले होते त्यानंतर भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा झाली असून घुसखोरी ४३ टक्क्य़ांनी कमी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत मंगळवारी दिली.

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी कमी झाली आहे, काय या प्रश्नावर राय यांनी सांगितले की, बालाकोट येथील हवाई हल्ले तसेच त्यानंतर सातत्याने सुरक्षा दलांनी केलेले प्रयत्न यामुळे या वर्षांच्या पहिल्या काही महिन्यात काश्मीरमधील परिस्थिती २०१८ मधील याच तुलनात्मक काळाचा विचार करता सुधारली असून घुसखोरीत ४३ टक्के घट झाली आहे. केंद्र सरकारने दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले असून आंतरराष्ट्रीय सीमेवर बहुस्तरीय तैनाती करण्यात आली आहे, सीमेवरील कुंपण, गुप्तचर माहिती व मोहिमातील समन्वय, सुरक्षा दलांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रे यामुळे घुसखोरी कमी झाली आहे.

आणखी एका प्रश्नावर त्यांनी सांगितले की, भारत पाकिस्तान यांच्यातील सीमेवर घुसखोरी विरोधी अडथळे यंत्रणा वीज तारांच्या स्वरूपात उभारली असून त्यामुळे घुसखोरीला आळा बसण्यात मदत झाली आहे. पॉवर ग्रीडमधील वीज या तारांमध्ये सोडण्यात आली असून काही ठिकाणी जनरेटरने वीज तयार करून तारांमध्ये सोडली आहे.