इराकी सुरक्षा दलांनी अल वालीद सीमेवरील प्रवेशद्वाराची छावणी पुन्हा ताब्यात घेतली आहे.
ही छावणी इराक व सीरियाच्या सीमेवर असून सुन्नी अरब अतिरेक्यांनी ती दोन दिवस ताब्यात घेतली होती. रविवारी अतिरेक्यांनी सायंकाळी या चौकीचा ताबा घेतला व नंतर आता ती पुन्हा इराक सरकारच्या हाती आली आहे, असे सुरक्षा दलांच्या कर्नल व मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी प्रतिकार न करताच हे प्रवेशद्वार सोडून दिले. त्यामुळे ती सुरक्षा दलांच्या हाती पडली.
‘इसिल’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी पाच इराकी प्रांतात ९ जूनपासून हल्ले करीत बराच प्रांत काबीज केला आहे. सुरक्षा दलांची सुरूवातीला पीछेहाट झाली होती, पण आता ते दहशतवाद्यांचे हल्ले मोडून काढीत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सोमवारी बगदादला भेट देऊन पंतप्रधान नुरी अल मलिकी यांच्याशी चर्चा केली व त्यांना सर्व गटांना सामावून घेत सरकार चालवण्याची सूचना केली.
१७ भारतीयांची सुटका
इराकच्या हिंसाचारग्रस्त भागांत अडकलेल्या आणखी १७ भारतीयांची स्थानिक शासनाच्या साहाय्याने सुटका करण्यात भारताला यश आले आह़े  त्यामुळे आतापर्यंत सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची संख्या ३४ झाली आह़े  तसेच इराकमधील बिकट राजकीय परिस्थिती पाहता अन्य भारतीयांना स्वत:हून देश सोडण्याचे आवाहनही भारताने केले आह़े
 हिंसाचारग्रस्त भागात राहणाऱ्या भारतीयांनी घराबाहेर पडू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या नव्या प्रवासी मार्गदर्शिकेत म्हटले आह़े