उत्तर प्रदेशमधील सुप्रसिद्ध अलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज करण्यात येणार आहे. एकामागून एक अशा स्वरुपाचे नाव बदलाचे निर्णय़ घेणाऱ्या योगी सरकारवर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्या फेसबुकवरुन त्यांनी १८ जिल्ह्यांच्या नावांची यादीच सादर केली असून या शहरांची नावेही बदलण्याचा खोचक सल्ला दिला आहे.

न्या. काटजूंनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज ठेवल्याबद्दल अभिनंदन. मात्र, हे केवळ पुरेसे नाही. बाबरच्या वंशजांची नावे संपवण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व शहरांच्या नावांमध्ये बदल करण्यात यावेत, अशी मी तुम्हाला विनंती करतो. तसेच मी पाठवलेल्या यादीत सध्याच्या नावांऐवजी पर्यायी नावेही सुचवली आहेत, त्याचाही विचार व्हावा.

अलिगढचे अश्वत्थामा, आग्राचे आगस्तय नगर, गाजीपूरचे गणेसपूर, शाहजहांपूरने सुग्रीवसूर, मुजफ्फरनगरचे मुरली मनोहरनगर, आजमगढचे अलकनंदापूर, हमीरपूरचे हस्तिनापूर, लखनऊचे लक्ष्मणपूर, बुलंदशहरचे बजरंगबलीपुर, फैजाबादचे नरेंद्र मोदीपूर, फतेहपूरचे अमित शाहनगर, गाजियाबादचे गजेंद्र नगर, फिरोजाबादचे द्रोणाचार्य नगर, फर्रुखाबादचे अंगदपूर, गाजीयाबादचे घटोत्कचनगर, सुल्तानपूरचे सरस्वतीनगर, मुरादाबादचे मन की बात नगर, मिर्जापुरचे मीराबाई नगर असे पर्यायी नामकरण करण्यात यावे असे काटजू यांनी मुख्यमंत्री योगींना सुचवले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी कुंभमेळा मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत याला मंजूरी देण्यात आली. गंगा आणि जमुना या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर अलाहाबाद शहर वसलेले असल्याने येथे सर्व प्रयागांचे राज्य आहे. त्यामुळे याचे नाव प्रयागराज करण्यात येणार आहे. हे नाव बदलण्याची संतांची मागणी होती. त्याला राज्यपाल राम नाईक यांनीही मंजूरी दिली आहे, असे रविवारी योगींनी सांगितले होते.