दिल्ली पोलिसांनी जेएनयू प्रकरणात उमर खालीद व अनिरबन भट्टाचार्य यांच्यासमवेत विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्यासह जाबजबाब घेतले. दक्षिण दिल्ली पोलीस स्टेशनला हे जबाब घेण्यात आले. सकाळी सुरू झालेले जाबजबाब पाच तास चालले. पहिल्या फेरीत कन्हैयाकुमारला खालिद व अनिरबनच्या समोर आणण्यात आले. तिघांचे एकत्र जाबजबाब झाले, ते दोन तास चालले. कन्हैया याने आतापर्यंत असे सांगितले आहे की, दोन गटात गोंधळ उडाल्यानंतर आपण विद्यापीठातील खोलीतून बाहेर आलो व अफजल गुरूच्या फाशीला विरोध करण्याच्या घटनेशी काही संबंध नाही. खालीद यानेही त्या घटनेत सामील असल्याचा इन्कार केला. पोलिसांसमक्ष देशविरोधी घोषणा दिल्याचे अनिरबन याने नाकारले. पहिल्या फेरीत खालीद व अनिरबनसमोर कन्हैयाचे वेगवेगळे जाबजबाब झाले. दोन पथकांनी त्यांना प्रश्न विचारले. या कार्यक्रमाचे आयोजक कोण होते याचा तपास पोलीस करीत आहेत. चित्रफितीत विद्यापीठाबाहेरचे काही जण दिसत आहेत ते कोण होते याचाही विचार केला जात आहे. उमर व अनिरबन हे मुख्य आयोजक होते असे पोलिसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. न्यायालयात मात्र तपासकर्त्यांंनी या घटनेत बाहेरील शक्तींचा हात असल्याचे सांगितले. दिल्ली न्यायालयाने कन्हैयाकुमारची पोलीस कोठडी काल वाढवून दिली होती. कन्हैयाला १२ फेब्रुवारीस तर अनिरबन व खालीद यांना त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे सोमवारी अटक केली होती.