तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी मंगळवारी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूचे आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे. करुणानिधी हे दक्षिणेतील दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक होते. तामिळनाडूच्या राजकारणात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. आज करुणानिधींना आपण राजकारणी म्हणून ओळखत असलो तरी त्यांचा प्रवास चित्रपटांपासून सुरु झाला होता. तामिळनाडूच्या या लोकप्रिय नेत्याविषयी जाणून घ्या काही खास गोष्टी.

– एम. करुणानिधी म्हणजेच मुत्तुवेल करुणानिधी यांचा जन्म ३ जून १९२४ रोजी तिरुकुवालाईमध्ये झाला. करुणानिधी यांनी एकूण तीन विवाह केले. त्यांच्या तीन पत्नींपैकी पद्मावती यांचे निधन झाले आहे. करुणानिधी यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. पद्मावतीपासून त्यांना एमके मुथू हा मुलगा आहे. दयालुपासून त्यांना एमके अलागिरी, एमके स्टालिन, एमके तमिलरासू आणि मुलगी सेल्वी अशी चार मुले आहेत. रजतिपासून त्यांना कनिमोळी ही मुलगी आहेत. कनिमोळी राज्यसभेवर खासदार आहेत.

– करुणानिधी वयाच्या १४ व्या वर्षीच राजकारणात उतरले. हिंदी-हटाओ आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. १९३७ साली शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. दक्षिणेत या निर्णयाला मोठा विरोध झाला. करुणानिधी सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते. लेखणीला हत्यार बनवत त्यांनी हिंदी भाषेला अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार लेखन केले. हिंदी भाषेविरोधात रेल्वे ट्रॅकवर उतरुन त्यांनी आंदोलन केले.

– हिंदी विरोधी आंदोलनानंतर करुणानिधी यांचे लेखन-वाचन सुरु होते. वयाच्या २० व्या वर्षी तामिळ चित्रपट कंपनी ज्यूपिटर पिक्चर्समधून त्यांनी पटकथा लेखक म्हणून आपल्या करीयरची सुरुवात केली व अनेक लोकप्रिय तामिळ चित्रपटाच्या कथा लिहिल्या.

– द्रमुकच्या स्थापनेनंतर एम. करुणानिधी यांनी अण्णादुराई यांचा विश्वास संपादन केला व त्यांचे निकटवर्तीय बनले. तामिळनाडूत पक्षाचा पाया भक्कम करण्याची आणि पैसे गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. करुणानिधी यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या निभावली. या दरम्यान त्यांचे तामिळ चित्रपटात लेखन सुरुच होते. समाजातील वाईट गोष्टी आणि द्रविड अस्मितेचे विषय त्यांनी चित्रपटातून मांडले.

– १९५७ साली द्रमुक पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला. त्यावेळी पक्षाचे एकूण १३ आमदार निवडून आले त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होता. त्यानंतर द्रमुकची राज्यातील लोकप्रियता वाढत गेली व अवघ्या दहावर्षात या पक्षाने तामिळनाडूचे राजकारणच बदलून टाकले. १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला पहिल्यांदा पूर्ण बहुमत मिळाले व अण्णादुराई तामिळनाडूतील बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. सत्ता मिळाल्यानंतर दोन वर्षातच १९६९ साली अण्णादुराई यांचे निधन झाले.

– अण्णादुराई यांच्यानंतर करुणानिधींनी द्रमुकची धुरा संभाळली व मुख्यमंत्री बनले. त्यानंतर १९७१ सालच्या निवडणुकीत करुणानिधी यांनी स्वबळावर सत्ता मिळवली व मुख्यमंत्री बनले. या प्रवासात त्यांना लोकप्रिय अभिनेते एमजी रामचंद्रन यांची साथ मिळाली. पण ही मैत्री फारकाळ टिकली नाही. एमजीआर यांनी अण्णाद्रमुक हा स्वतंत्र पक्ष स्थापना केला. १९७७मध्ये एमजीआरनी करुणानिधी यांचा मोठा पराभव केला.

– ६० वर्षाच्या राजकीय करीयरमध्ये करुणानिधी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. सर्वाधिक १३ वेळा आमदार बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.