देशभरात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या काळात लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही देशातील काही भागांमध्ये लोकं नियम मोडत लॉकडाउनमध्ये रस्त्यावर येत आहे. काही ठिकाणी सुशिक्षित लोकंही रस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. कोलकात्यात लॉकडाउन काळात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या तिघा उद्योगपतींना पोलिसांनी अटक केली आहे.

अवश्य वाचा – Lockdown : गोव्यातील बिअर शॉप धारकांना स्टॉक संपण्याची भीती

सरानी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी हा प्रकार घडला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना रात्री १२ वाजून ५ मिनीटांनी एका अलिशान गाडीतून फिरणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी या व्यक्तींना ताब्यात घेतलं तेव्हा तिघेही दारुच्या नशेखाली होते. महत्वाची गोष्ट म्हणजे या गाडीची नंबरप्लेटही बनावट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. अखेरीस पोलिसांनी तिन्ही उद्योगपतींवर दारु पिऊन गाडी चालवणे, लॉकडाउनचे नियम मोडणे आणि वाहन कायद्यातील तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बनावट नंबरप्लेटविषयी कोलकाता पोलिस अधिक चौकशी करत असल्याचं पोलीस उप-आयुक्त मिर्झा खलिद यांनी सांगितलं.