काँग्रेससोबत मिळून आघाडी सरकार चालवताना मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी प्रचंड दबावाखाली आहेत. पण त्यासाठी कोणाला जबाबदार धरणार नाही असे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे सर्वेसर्वा एच.डी.देवेगौडा यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या ८० आमदारांना सोबत घेऊन सरकार चालवणे सोपे नाही. दबावाखाली असले तरी कुमारस्वामी ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. दोन्ही पक्षांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे असे देवेगौडा रविवारी एक सभेमध्ये म्हणाले.

आधीच्या सिद्धरमय्या सरकारचे कार्यक्रम तसेच पुढे चालू ठेवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी संताप व्यक्त केला. सिद्धरमय्या सरकारचे कार्यक्रम चालू ठेवताना शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा दिली असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. कुमारस्वामींनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असे गौडा म्हणाले. पंतप्रधानपदासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठिंबा दिला.

भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’
कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरु आहे असा आरोप कर्नाटकचे जलसिंचन मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केला आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजपा नेत्यांसोबत आहेत असा दावा शिवकुमार यांनी केला. राज्यात घोडेबाजार सुरु आहे. आमचे तीन आमदार मुंबईत हॉटेलमध्ये असून भाजपा आमदार आणि नेते त्यांच्यासोबत आहेत.

मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्यावर शिवकुमार यांनी भाजपाबद्दल सौम्य भूमिका स्वीकारल्याचा आरोप केला. आमचे मुख्यमंत्री भाजपाबद्दल थोडे सौम्य आहेत. त्यांना जे सत्य माहित आहे ते सर्वांसमोर त्यांनी उघड केलेले नाही या अर्थाने मी त्यांना सौम्य म्हटले.