हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधाच्या पुरवठयावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर भारताने मंगळवारी अंशत: या औषधावरील निर्याबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘जीवन वाचवणारी’ औषधे सर्वप्रथम भारतीयांना उपलब्ध करुन देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली आहे.

“मैत्रीमध्ये बदला घेण्याची भाषा येत नाही. भारताने या कठिण काळात सर्वच देशांना मदतीचा हात दिला पाहिजे. पण जीव वाचवणारी औषधे सर्वप्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन दिली पाहिजेत” असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.

आणखी वाचा- औषधांचा पुरवठा करु, राजकारण करु नका, भारताने अमेरिकेला सुनावलं

हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे मूळ मलेरीया विरोधी औषध आहे. मलेरीयाच्या रुग्णाला बरे करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या करोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. भारतात मोठया प्रमाणावर या औषधाची निर्मिती केली जाते. करोना व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे अमेरिकेला तातडीने या औषधांची गरज आहे. मागच्या महिन्यात भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली.