औरंगाबादमधील बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ मजूरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. या अपघामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर  उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र अशाप्रकारे रेल्वे अपघातामध्ये अनेकांना प्राण गमावावा लागल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीच अशाप्रकारच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. जाणून घेऊयात मागील काही वर्षांमध्ये घडलेल्या अशाच काही धक्कादायक अपघातांबद्दल…

२०१३

१९ ऑगस्ट २०१३
बिहारमधील खगडिया जिल्ह्यात राज्यराणी एक्सप्रेसने ३७ जणांना उडवले होते. समस्तीपुराहून सहरसा जाणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसने ट्रॅकवरुन चालणाऱ्या कावडियांना उडवलं होतं

२ नोव्हेंबर २०१३
रायगड येथून विजयवाडाला जाणाऱ्या ट्रेनने आंध्र प्रदेशमधील गोतलाम रेल्वे स्थानकामध्ये आठ जणांना चिरडले होते.

२८ डिसेंबर २०१३
आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील पुत्तापर्थीजवळ बेंगळुरू नांदेड एक्सप्रेसच्या एसी डब्ब्याला आग लागल्याने २६ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये १२ जण जखमी झाले होते. मरण पावलेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. पहाटेच्यावेळी अनेकजण साखर झोपेत असताना आग लागल्याने मरण पावणाऱ्यांची संख्या जास्त होती.

२०१४

८ जानेवारी २०१४
वांद्र्याहून देहरादूनला जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीच्या तीन स्लीपर डब्ब्यांना आग लागल्याने पाच जाणांचा मृत्यू झाला होता तर चार जण जखमी झाले होते. हा अपघात सूरतजवळील धनाउ रोड आणि घोलवड स्टेशनच्या दरम्यान झाला होता. या अपघात नक्की कशामुळे झाला हे उघड होऊ शकलेले नाही. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता फेटाळून लावली होती.

१७ फेब्रुवारी २०१४
नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये निजामुद्दीन एर्नाकुलम लक्षद्वीप मंगला एक्सप्रेसचे १० डब्बे रुळावरुन घसरले होते. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता तर ३७ प्रवासी जखमी झाले होते.

४ मे २०१४
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी ट्रेनचे इंजिन आणि सहा डब्बे रुळावरुन घसरले होते. या अपघातामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता तर १२४ प्रवासी जखमी झाले होते.

२६ मे २०१४
उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर जिल्ह्यामध्ये गोरखधाम एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली होती. यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात चुरेन रेल्वे स्थानकाजवळ झाला होता.

२०१५

२० मार्च २०१५
देहरादूनवरुन वाराणसीला जाणाऱ्या जनता एक्सप्रेसचे काही डब्बे रुळावरुन घसरले होते. या अपघातामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला होता.

२०१६

१ मे २०१६
फैजाबाद-दिल्ली एक्सप्रेस हापूडजवळ रुळावरुन घसरली होती. मात्र चालकाने वेळीच वेग कमी केल्याने कोणत्याही प्रवाशाला जीव गमावावा लागला नाही.

६ मे २०१६
चेन्नई सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसने एका ट्रेनला धकड दिली होती. यामध्ये सात जण जखमी झाले होते.

२० नोव्हेंबर २०१६
कानपूरच्या पुखरायामध्ये इंदौर-राजेंद्र नगर एक्सप्रेस रुळावरुन घसरली होती. या अपघातामध्ये दीडशे प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता तर २६० जण जखमी झाले होते.

२८ डिसेंबर २०१६
कानापूर जवळ अजमेर-सियालदाह एक्सप्रेसचे १५ डब्बे रुळावरुन घसरले होते. यामध्ये ४० हून अधिकजण जखमी झाले होते.

२०१७

२१ जानेवारी २०१७
कुनेरुजवळ जगदलपूर-भुवनेश्वर हीराखंड एक्सप्रेस गाडी रुळावरुन घसरली होती. यामध्ये ४० प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर ६८ जण जखमी झाले होते.

७ मार्च २०१७
मध्य प्रदेशमधील जबरी रेल्वे स्थानकाजवळ भोपाल उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये एक स्फोट झाला होता. यामध्ये १० जण जखमी झाले होते.

३० मार्च २०१७
उत्तर प्रदेशमधील महोबामध्ये महाकौशल एक्सप्रेस रुळावरुन घसरली होती. यामध्ये ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.

१५ एप्रिल २०१७
मेरठ-लखनऊ राज्यराणी एक्सप्रेसचे ८ डब्बे उत्तर प्रेदेशमधील रामपुरजवळ रुळावरुन घसरले होते. यामध्ये १० जण जखमी झाले होते.

२०१८

१० ऑक्टोबर २०१८
मालदा टाऊनवरुन नवी दिल्लीला जाणाऱ्या न्यू फरक्का एक्सप्रेसच्या इंजिनसहीत नऊ डब्बे रुळावरुन घसरले होते. रायबरेलीजवळ हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये सात जणांचा जीव गेला होता तर ३५ हून अधिक प्रवासी जखमी जाले होते.

१९ ऑक्टोबर २०१८
अमृतसरमध्ये दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रावणदहनाच्या कार्यक्रमामध्ये मोठा रेल्वे अपघात घडला होता. रेल्वे ट्रॅकवर उभ्या असणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवले होते. यामध्ये ६१ जणांमा मृत्यू झाला होता तर १०० हून अधिकजण जखमी झाले होते. हा अपघात जोडा फाटक परिसरामध्ये झाला होता.

२०१९-२०२० आर्थिक वर्षात मोठा अपघात नाही
भारतीय रेल्वेच्या १६६ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष असं ठरलं ज्यामध्ये कोणताही मोठा अपघात झाला नाही. या आर्थिक वर्षात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही असा दावा भारतीय रेल्वेने केला होता. हे वर्ष ‘झीरो पॅसेंजर डेथ’चे ठरले असं रेल्वेने म्हटलं होतं.