लष्करे तैय्यबाचा कमांडर झाकीऊर रेहमान लख्वी याला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातील न्यायालयाने जामीन मंजूर केल्याबद्दल शुक्रवारी लोकसभेमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी एकसुरात नाराजी व्यक्त करीत याचा निषेध केला. सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने आपल्या भावना कडक शब्दांत पाकिस्तानपर्यंत पोहोचविल्या असल्याचे सांगितले. पेशावरमधील शाळेत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलांचा जीव गेल्यानंतर दुसऱयाच दिवशी एका दहशतवाद्याला जामीन मिळाल्याची घटना धक्कादायक असल्याचेही मोदी यांनी सांगितले. पाकिस्तान सरकारच्या प्रत्येक कारवाईवर केंद्र सरकार लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. पाकिस्तान सरकार सर्व दहशतवाद्यांकडे एकाच नजरेतून पाहात नसल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाल्याचे त्या म्हणाल्या. लख्वीला जामीन मंजूर झाल्याचा निषेध करणारा ठराव लोकसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
पाकिस्तानी सरकारने दहशतवाद्यांविरोधात कडक पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी आपल्या भाषणावेळी केली. 
लख्वीला जामीन मंजूर केल्याचा विषय लोकसभेत शून्यकाळात उपस्थित करण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे, किरीट सोमय्या, अरविंद सावंत, के. कविता, मोहंमद सलीम, कल्याण बॅनर्जी, राजेश रंजन, असादुद्दिन ओवैसी यांच्यासह इतरही सदस्यांनी या घटनेचा निषेध केला. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ शेवटच्या दहशतवाद्याला मारत नाही, तोपर्यंत याविरुद्धची लढाई सुरूच राहणार असल्याचे सांगत आहेत आणि दुसरीकडे मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंडला जामीन मंजूर करण्यात येतो आहे, या विरोधाभासाकडे सदस्यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानच्या भारतातील राजदूतांना बोलावून त्यांच्याकडे लख्वीला जामीन मंजूर झाल्याविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात यावी, अशीही मागणी सदस्यांनी केली. त्याचबरोबर लख्वीविरोधात पाकिस्तानला अजून काही पुरावे हवे असतील, तर तेही त्यांना देण्यात यावे, असे काही सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले.