लॉस एंजलिस : वासाची संवेदना नष्ट होणे हे करोनाबाधित व्यक्तींसाठीचे एक लक्षण असल्याचे दिसून आले आहे. करोनारुग्णांमध्ये ताप व घसा धरणे ही लक्षणे दिसतात, हे आतापर्यंत सर्वानाच माहिती होते; पण वास व चवीची संवेदना नष्ट होणे हा करोना संसर्गाचा संकेत असतो असे सांगण्यात येत आहे. हे संशोधन रुग्णांनी दिलेल्या माहितीवर आधारित असल्याने त्याला अचूकतेबाबत अनेक मर्यादा आहेत.

इंटरनॅशनल फोरम ऑफ अ‍ॅलर्जी अँड ऱ्हाइनॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, वास व चव या संवेदना नाहीशा होणे हेही करोना म्हणजे सार्स सीओव्ही २ विषाणूच्या संसर्गाचे निदर्शक आहे, असे यापूर्वीही एका संशोधनातून सांगण्यात आले होते. त्याच अनुषंगाने हा अभ्यास करण्यात आला. सॅनडियागो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, ज्या लोकांची वासाची संवेदना तात्पुरती नाहीशी होते त्यांच्यात करोनाचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता असू शकते  हे खरे असले, तरी वास संवेदना नसलेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता करोनाची इतर लक्षणे दाखवणाऱ्या करोना रुग्णांपेक्षा दहा पट कमी असते.

यातील प्रमुख संशोधक कॅरॉल यान यांच्या मते, सध्या करोनारुग्णांना कुठल्या प्रकारचे उपचार द्यावेत हे आरोग्य सेवेपुढचे आव्हान आहे. जर त्यांच्यात कमी किंवा सौम्य लक्षणे असतील तर ते घरात विलगीकरणात राहून बरे होऊ शकतात. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्यांना रुग्णालयात ठेवून गर्दी वाढवण्याची गरज नाही. जर एखाद्याची वासाची संवेदना तात्पुरती गेली असेल तर त्या व्यक्तीला कोविड १९ असण्याची शक्यता असते पण त्याची तीव्रता सौम्य असते.

वासाची संवेदना गेल्याने कोविड १९ ची बाधा झाली असे समजून कुणी घाबरून जाऊ नये उलट यात सौम्य लक्षणे असतात व त्यात तो १४ दिवस वेगळे राहिल्यास बरा होतो.  ३ मार्च व ८ एप्रिल दरम्यान १६९ रुग्णांवर याबाबत प्रयोग करण्यात आले, त्यांच्या चाचण्या सकारात्मक आलेल्या होत्या. वास व स्वादग्रंथींच्या कामावर यात परिणाम होऊ शकतो. १६९ पैकी १२८ जणांच्या वास व स्वाद माहितीचे संकलन करण्यात आले, त्यातील २६ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. ज्या रुग्णांची वास संवेदना कमी झाली त्यांच्यात रुग्णालयात दाखल करण्याची वेळ कमी वेळा आली, म्हणजे हे प्रमाण २६.९ टक्के होते.

वास संवेदना नष्ट होण्याला अनॉसमिया म्हणतात, तर चव संवेदना जाण्याला डिसगेशिया म्हणतात. चव जाण्याच्या लक्षणाचा संबंध करोनासंदर्भात रुग्णालयात दाखल करण्याच्या शक्यतेशी जोडण्यात आला आहे. त्यातील आकडेवारीही सारखीच आहे. ज्या लोकांत वासाची संवेदना रहात नाही त्यांच्यात इतर कोविडरुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता १० पटींनी कमी असते. याचा अर्थ एखाद्याची  वास किंवा चव संवेदना  तात्पुरती गेली  या कारणावरून त्याला रुग्णालयात दाखल करतात असा नाही. केवळ सौम्य करोना लक्षणात वास व चव जाण्याचा समावेश आहे, असे यातील आणखी एक संशोधक अ‍ॅडम एस डीकाँड यांचे मत आहे.

वास संवेदना का जाते

करोनाचा सार्स सीओव्ही २ विषाणू हा पहिल्यांदा नाकात साठून राहतो, नंतर तो श्वसनमार्गाकडे वळतो. तत्पूर्वीच तो वासाशी संबंधित ग्रंथींवर परिणाम करतो. अगदी कमी संसर्गात हे घडते. कदाचित आपली प्रतिकारशक्ती यंत्रणा तेथे जो ठोस प्रतिकार करते त्याचा परिणाम म्हणून विषाणू नाकापुरत्या भागातच राहून संसर्ग इतरत्र पसरत नाही  व त्यामुळे वास संवेदना कमी होते, त्यामुळे हे लक्षण सौम्य संसर्गाचे सूचक आहे, असा त्याचा सकारात्मक अर्थही आहे.