मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित याने मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सरन्यायाधीस जे.एस. खेहर यांनी सांगितले की, याबाबतची याचिका नियमित पातळीवर सुनावणीसाठी येईल. पुरोहित यांनी यावर तातडीने सुनावणी करण्याची केलेली मागणी मान्य करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने याच प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना २५ एप्रिल रोजी जामीन मंजूर केला होता. मालेगाव बॉम्बस्फोट सप्टेंबर २००८ मध्ये झाला होता, त्याचा कट रचल्याचा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर होता. याच प्रकरणातील आरोपी पुरोहित याच्यावरचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, असे सांगून उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटरसायकलवर बांधलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सहा ठार तर १०० जण जखमी झाले होते. साध्वी प्रज्ञा व पुरोहित यांना त्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. साध्वी प्रज्ञा यांना कर्करोग झालेला असून त्यांच्यावर मध्यप्रदेशातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुरोहित सध्या तळोजा तुरूंगात आहे. उच्च न्यायालयाने असे म्हटले होते, की सकृतदर्शनी प्रज्ञा यांच्यावर कुठलेही आरोप नाहीत. त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी पासपोर्ट एनआयएकडे जमा करून पाच लाखांचे हमीपत्र दिले. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. या प्रकरणाचा तपास एटीएसकडून काढून एनआयएकडे दिला होता, पण साध्वी प्रज्ञा या निर्दोष असल्याचे एनआयएने म्हटले होते. पुरोहित याच्या जामीन अर्जाला मात्र त्याच्यावरचे आरोप गंभीर असल्याने एनआयएने विरोध केला होता.

एनआयएने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, पुरोहित याने हिंदू  राष्ट्राची वेगळी राज्यघटनाच तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात भगवा झेंडा व इतर बाबींचा समावेश होता, तसेच हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मुस्लिमांचा सूड घेण्याची चर्चा केली होती. एनआयएने काही विशिष्ट व्यक्तींना सोडून दिले व मला मात्र बळीचा बकरा केले असे पुरोहित याने युक्तिवादात म्हटले होते.