आज अटलबिहारी वाजपेयी असते तर त्यांनी भाजपाला राजधर्माची आठवण करुन दिली असती असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा CAA आणि NRC वरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशातल्या ३८ टक्के जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केलं आहे म्हणजेच याचा दुसरा अर्थ हा होतो की ६२ टक्के जनतेने त्यांना नाकारलं आहे असंही त्या म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याबाबत मतदान घेतलं जावं असंही त्यांनी सुचवलं आहे. एवढंच नाही तर भाजपा सरकारचा या मतदानात पराभव झाला तर त्यांनी सत्ता सोडावी असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

” भाजपाला बहुमत मिळालं याचा अर्थ असा होत नाही की ते मनमानी करतील. भाजपात हिंमत असेल तर त्यांनी सीएए आणि एनआरसी या दोन्ही कायद्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली मतदान घ्यावं. त्यामध्ये भाजपा अपयशी ठरली तर त्यांनी सत्ता सोडावी.” भाजपा त्यांच्या समर्थकांना आंदोलनांमध्ये घुसवून दंगे घडवणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. एवढंच नाही तर CAA आणि NRC हे दोन्ही कायदे पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं झाली. या आंदोलनाला देशभरात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. उत्तर भारतात हिंसक वळण लागण्याचं प्रमाण सर्वाधिक होतं. लखनऊ या ठिकाणी पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि कर्नाटक या ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीचे प्रकार घडले. दिल्लीच्या बहुतांश भागांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद करण्यात आली होती.