आपल्या लग्नाला सेलिब्रिटींनी आणि बड्या व्यक्तींने यावे असं प्रत्येक सामान्य व्यक्तीला वाटतं. मात्र खऱ्या आयुष्यात ते शक्य नसतं. असंच काहीसं झालं तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये राहणाऱ्या राजशेखरन कुटुंबियांबरोबर. आपल्या मुलीच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावावी असं राजशेखरन कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठवले. दिल्लीमधील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर या कुटुंबाने मोदींना लग्नाची पत्रिका पाठवली आणि ते याबद्दल विसरुन गेले. मात्र पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या आमंत्रणाला खरोखरच उत्तर दिले. मोदींचे पत्र मिळाल्याने राजशेखरन कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

टी. एस. राजशेखरन यांनी त्यांची मुलगी राजश्री हिच्या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठवले. राजशेखरन हे निवृत्त वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्या मुलीचे लग्न आज म्हणजेच ११ सप्टेंबर म्हणजेच आज आहे. या लग्नासाठी त्यांनी पंतप्रधानांना खास आमंत्रण पाठवले होते. पंतप्रधानांनी या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वराला आशिर्वाद द्यावे अशी इच्छा या आमंत्रणामध्ये राजशेखरन कुटुंबाने व्यक्त केली होती. मात्र पंतप्रधान पदी असणारी व्यक्ती आपल्या आमंत्रणाची दखल घेईल की नाही याबद्दल राजशेखरन यांना शंका होती. तरी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर हे आमंत्रण पाठले.

रविवारी राजशेखरन कुटुंबाला आर्श्चयाचा धक्काच बसला. त्यांना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आमंत्रणासंदर्भात उत्तर देणारे पत्र पाठवले. ‘तुमची मुलगी डॉ. राजश्रीचे लग्न डॉ. सुदर्शन यांच्याशी होत असल्याचे समजले. खूप आनंद झाला. तुमच्या आयुष्यातील या महत्वपूर्ण सोहळ्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. वैवाहिक दांपत्याला समृद्धी आणि समाधान लाभू दे,’ असं या पत्रामध्ये मोदींनी म्हटले आहे.

चक्क पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र मिळाल्यानंतर राजशेखरन कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला. मोदींचे हे पत्र फ्रेम करुन ठेवणार असल्याचे राजशेखरन कुटुंबाने म्हटले आहे. मोदींचे पत्र ही आमच्यासाठी या मंगल प्रसंगी खूप मोठी भेट असल्याची भावना राजशेखरन कुटुंबाने व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाला येऊ शकणार नाहीत याचा अंदाज राजशेखरन कुटुंबालाही होता. मात्र मोदींनी पाठवलेल्या उत्तरामुळे त्यांनी पाठवलेल्या आमंत्रणामुळे मोदींच्या शुभेच्छा मिळाल्याचा आनंद असल्याचे या कुटुंबाने स्पष्ट केले.