केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या सहकारी मनेका गांधी यांच्या प्राणीहक्कांसंबंधीच्या पुस्तकांचा समावेश विधि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात करावा, अशी सूचना कायदामंत्री सदानंद गौडा यांनी बार कौन्सिलला केली आहे. कट्टर प्राणीप्रेमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनेका गांधी यांच्या अशा पुस्तकांची यादीही गौडा यांनी या पत्रासोबत पाठविली आहे.
बार कौन्सिलचे अध्यक्ष मननकुमार मिश्र यांना पाठविलेल्या पत्रात गौडा यांनी म्हटले आहे, की ‘.. काही काळासाठी मांसाहाराचा मुद्दा बाजूला ठेऊ या. परंतु शेती, धार्मिक कार्यक्रम, खेळ, मनोरंजन यांत आपण किती प्रकारे प्राण्यांचा छळ करीत असतो याची जाणीव नागरिकांना करून देणे आवश्यक आहे. वकिलांना प्राणीहक्कांविषयीच्या, प्राण्यांचा छळवाद रोखण्याबाबतच्या विविध कायद्यांची माहिती करून देणे आवश्यक आहे. त्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या सर्व बाबींचा समावेश विधि अभ्यासक्रमात करणे.. त्यादृष्टीने या पत्रासोबत प्राणीहक्कांबाबतच्या विविध कायद्यांची यादी आणि मनेका गांधी यांच्या पुस्तकांची नावे जोडत आहे. त्यांचा समावेश अभ्यासक्रमात करावा.’
मात्र कुणा एकाच्या पुस्तकाची अशी शिफारस करणे हे अनैतिक आहे, अशा शब्दांत दिल्लीतील राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रणबीरसिंग यांनी गौडा यांच्या सूचनेवर आक्षेप घेतला आहे. विधि महाविद्यालयांत पर्यावरण अभ्यासक्रमविभागात वन्यप्राणी सुरक्षा यांसारखे कायदे आधीपासूनच शिकविले जात असल्याचेही डॉ. सिंग यांनी निदर्शनास आणून दिले. दिल्ली विद्यापीठातील कायदा विभागाचे माजी डीन डॉ. एस. एन. सिंग यांनीही, कायदा मंत्र्याने अभ्यासक्रमात कोणत्या पुस्तकाचा समावेश करावा असे सांगणे हे ‘अत्यंत आक्षेपार्ह’ असल्याचे म्हटले आहे. घटनेतील कलम ५१-अचा वा पर्यावरणविषयक कायद्यांचा अभ्यास करताना त्यात प्राणीकल्याण विषयीच्या कायद्यांचा समावेश होतोच, असेही त्यांनी सांगितले.