मुंबईत पर्युषण पर्वकाळात मांस विक्रीवर विविध काळांसाठी बंदी घातली असतानाच आता राजस्थान व छत्तीसगड या भाजपची सत्ता असलेल्या राज्यात वेगवेगळ्या काळासाठी मांस विक्रीला बंद घातली आहे. पर्युषण काळ व गणेश चतुर्थी निमित्त आठ दिवस मांस विक्रीला छत्तीसगड सरकारने बंदी घातली आहे. पंजाबमध्ये लुधियाना येथेही मांस विक्रीला बंदी घातली आहे.
दरवर्षीप्रमाणे शहर प्रशासन विभागाने नगर पालिकांना कत्तलखाने व मांसाची दुकाने १० ते १७ सप्टेंबर दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे छत्तीसगडचे शहर प्रशासन उप सचिव जितेंद्र शुक्ला यांनी सांगितले. गणेश चतुर्थी व पर्युषण पर्व यामुळे हा निर्णय घेतला असून त्यात १७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीही आहे. या काळात सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. रायपूर महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व विभागीय व आरोग्य अधिकारी तसेच पोलीस स्टेशन यांना त्याबाबत उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. पर्युषण पर्वात मांस विक्रीवर बंदी घालण्याची प्रथा राज्यात २०११ पासून आहे. राजस्थान सरकारने राज्यात सर्वत्र १७ व १८ सप्टेंबरला पर्युषण पर्वानिमित्त मांस व मासे विक्रीवर बंदी घातली आहे.
लुधियानातही बंदी
पंजाबमध्ये लुधियाना येथे जैन संवत्सरी निमित्त १७ सप्टेंबरला एक दिवस मांसाहारी पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. लुधियानाचे पोलीस आयुक्त परमराज सिंग उमरांगल यांनी ही बंदी जाहीर केली आहे. कलम १४४ अन्वये ही बंदी घातली आहे. मांसाहारी पदार्थाच्या विक्रीने जैन समुदायाच्या भावना दुखावतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ही बंदी हॉटेल्स, मांसाची दुकाने व मांसाहारी अन्नाची ठिकाणे येथे एक दिवसासाठी लागू आहे.
गुजरातेत अहमदाबाद येथे १० ते १७ सप्टेंबर या काळात गाय, म्हैस, बकरी, बैल यांच्या मांसाची विक्री करण्यास बंदी घातली आहे. जैनांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.