सायबर गुन्ह्यांचा तपास करताना भारतातील तपास यंत्रणांकडून मायक्रोसॉफ्टकडे गेल्या वर्षात ४०० हून अधिक वेळा वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागविण्यात आली. सायबर गुन्हेगारीचा फटका बसलेल्या ५९४ नेटिझन्सच्या तक्रारींचा तपास करताना मायक्रोसॉफ्टकडे मदतीसाठी वेगवेगळी माहिती देण्याची मागणी करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
तपासयंत्रणांनी कंपनीकडे मागितलेली माहिती ८८.५ टक्के वेळा त्यांना देण्यात आली. १०.५ टक्के वेळा मायक्रोसॉफ्टला संबंधित माहिती न मिळाल्याने तपास यंत्रणांना ती देण्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय कायदेशीर तरतुदींचे पालन होत नसल्यामुळे मायक्रोसॉफ्टने एक टक्का वेळा तपास यंत्रणांना संबंधित अकाऊंटची माहिती देण्यास नकार दिला होता, असेही कंपनीने स्पष्ट केले.
सन २०१२ मध्ये भारतीय तपास यंत्रणांनी मायक्रोसॉफ्टकडून एकूण ४१८ वेळा वेगवेगळ्या अकाऊंट्सची माहिती मागविली होती. देशातील ५९४ नेटिझन्सनी सायबर गुन्ह्यांतर्गत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. गेल्या वर्षातच ‘स्काईप’संदर्भातील माहिती देण्याची मागणी मायक्रोसॉफ्टकडे ५३ वेळा करण्यात आली होती.