जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. येथील वारपोरा भागातून पोलीस पथक जात असताना हा प्रकार घडला. या हल्ल्यात आत्तापर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सध्या हा सर्व संपूर्ण परिसर खाली करण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी बुरहान वानी मारला गेला होता. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर असंतोष उफाळून आला होता. काश्मीरमध्ये उफाळलेला हिंसाचार अद्यापही सुरूच असून मृतांचा आकडा ३२ वर गेला आहे, तर शेकडोहून अधिक जखमी झाले आहेत. चौथ्या दिवशीही काश्मीर खोऱयातील १० जिह्ल्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. आफ्रिका दौऱयाहून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्वरित उच्चस्तरीय आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल देखील उपस्थित आहेत.