केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्र्यांचा पुरातत्त्व खात्याला आदेश

कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील जुन्या शिवाजी पुलास समांतर असणाऱ्या पुलाचे थांबलेले बांधकाम सुरू करण्याची परवानगी देणारी अधिसूचना दोन दिवसांत काढा आणि आठ दिवसांच्या आत त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घ्या, असा कडक आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी पुरातत्त्व खात्याला दिला.

आठ दिवसांत सगळे अडथळे दूर झाले नाहीत तर तुम्हाला घरी बसवेन, असेही त्यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या समक्षच त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या पुरातत्त्व खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बजावले. प्राचीन वास्तूंच्या संवर्धनासाठी तुम्ही फार काही करीत नाही आणि अन्य विकासकामांना आडवे जाता, अशी कानउघाडणी करणाऱ्या गडकरींच्या या रुद्रावताराने अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. या बैठकीस राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. कोल्हापूरचे राष्ट्रपतिनियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारीच गडकरींची या पुलासंदर्भात भेट घेतली होती. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर ‘शिवाजी पूल’ हा जवळपास दीडशे वर्षे जुना पूल आहे. हा पूल वाहतुकीसाठी योग्य नसल्याने त्याच्या शेजारीच समांतर पूल बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतले आहे. मात्र या भागात प्राचीन अवशेष असल्याचे सांगून काही सामाजिक संस्थांनी पुरातत्त्व विभागाकडे तक्रार केली होती.

जर पुरातत्त्व खात्याच्या विलंबामुळे जुना ब्रिटिश पूल पडून महाडसारखी दुर्घटना घडल्यास सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आणि पुरातत्त्व खात्याच्या महासंचालकांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री