पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, प्रचार सभांमधून त्यांचा प्रभाव दिसून येतो. याचा फायदा भाजपाला होईल अशा शब्दांत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदींची स्तूती केली आहे. मात्र मोदींचा देशावर प्रभाव असला तरी त्यामुळे देशात मोदींची लाट आल्याचे म्हणता येत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
जम्मूत प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी मोदींचे गुणगान केले आहे. अब्दुल्ला म्हणाले, ”भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषीत केल्याने भाजपच्या मोजक्या मतदारांमध्ये उत्साह आहे. पण, सर्वसामान्य नागरिकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. मोदी यांचा देशभर प्रभाव असल्याचे नाकारणे, चुकीचे ठरेल.  राजकारणात कोणालाही कमी लेखू नये असे सांगत त्यांनी काँग्रेसला मोदींपासून सावधान राहण्याचा इशाराच दिला आहे.
‘तिसऱ्या आघाडीशी आपले काहीही देणेघेणे नाही. आपण त्या आघाडीत सहभागी होणार नाही. ‘नॅशनल कॉन्फरन्स’ यूपीएचा घटक पक्ष आहे. भविष्यातही ही मैत्री कायम राहील. एनडीएमध्ये सहभागी होणे ही आमची घोडचूक होती. पुन्हा तशी चूक आम्ही करणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.