कोविड-१९ च्या संशयितांवर करण्यात आलेली प्रत्यक्ष देखरेख आणि परदेशातून भारतात आलेल्यांची एकूण संख्या यात ‘तफावत’ असल्याचे दिसते. त्यामुळे टाळेबंदीपूर्वी देशात प्रवेश केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील देखरेख तत्काळ मजबूत करावी, असे मंत्रिमंडळ सचिव राजीव गऊबा यांनी राज्यांना सांगितले आहे.

भारतात आतापर्यंत ज्यांची चाचणी सकारात्मक आली आहे अशा लोकांनी परदेश प्रवास केल्याचे आढळले असल्याचे लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या देखरेखीतील अशा प्रकारच्या तफावतीमुळे कोविड-१९ चा फैलाव रोखण्याचे प्रयत्नांना गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो, असे गऊबा यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘१८ जानेवारी २०२० पासून आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर चाचणी सुरू केली, हे तुम्हाला माहीत आहेच. कोविड-१९ च्या संदर्भात देखरेख ठेवण्यासाठी देशात आलेल्या १५ लाखांहून अधिक प्रवाशांची माहिती ब्युरो ऑफ इमिग्रेशनने २३ मार्च २०२० पर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना दिली असल्याचे मला कळवण्यात आले आहे.

तथापि, राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांनी देखरेख ठेवण्याची आवश्यकता असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या आणि प्रत्यक्ष देखरेख ठेवण्यात येत असलेल्या प्रवाशांची संख्या यात तफावत असल्याचे दिसते,’ असे गऊबा यांनी या पत्रात नमूद केले आहे. करोना महासाथीचा फैलाव रोखण्यासाठी, सर्वच आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने देखरेख ठेवणे महत्त्वाचे आहे, यावर गऊबा यांनी भर दिला आहे.