नेपाळमध्ये कांचनजुंगा पर्वताच्या पश्चिमेकडील ८५०५ मीटर उंचीचे यालुंगकांग हे शिखर सर करीत असताना प्रसिद्ध महिला गिर्यारोहक छंदा गयेन आणि अन्य दोघे जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
छंदा गयेन या पश्चिम बंगालमधील पहिल्या महिला गिर्यारोहक म्हणून प्रख्यात असून, त्या मंगळवारपासून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. कोलकात्यामधील तुसी दास, दीपंकर घोष आणि राजीव भट्टाचारजी यांच्यासमवेत त्यांनी कांचनजुंगा हे ८५८५ मीटर उंचीचे, तसेच जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर १८ मे रोजी सर केले. तेथे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेसाठी हे सर्व जण गेले होते. सदर परिषद संपल्यानंतर तुसी, राजीव व दीपंकर यांनी तळावर परतण्याचा निर्णय घेतला, तर छंदा व दावा वांगचू आणि मिंग्मा तेंबा या शेर्पानी जवळच्या यालुंगकांग शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र मंगळवारी त्यांच्या मार्गावर बर्फाचे कडे कोसळल्यामुळे त्यामध्ये ते अडकले असावेत, असा अंदाज आहे.