दुधाच्या गोठ्यातील जनावराबरोबर लैंगिक चाळे करणाऱ्या एका ५३ वर्षीय विकृत रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. भोपाळच्या अशोक गार्डन भागात चार जुलै रोजी शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पण मंगळवारी संध्याकाळी अशोक गार्डन पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली आहे. डेअरी मालकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
तक्रारदार अशोक गार्डन भागातील सुंदर नगर येथे रहायला असून घराजवळच त्याचा डेअरीचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे एकूण १३ जनावरे आहेत, अशी माहिती अशोक गार्डन पोलीस ठाण्याच्या एसएचओने दिली. “चार जुलै रोजी मी गोठ्यामध्ये झोपलेलो असताना पहाटे ४.२० च्या सुमारास मला जनावराच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला. मी उठून आतमध्ये पाहिले, तेव्हा रिक्षा चालक एका जनावराच्या मागे उभा होता” असे डेअरी मालकाने पोलिसांना सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
रिक्षा चालकाला रंगेहाथ पकडल्यानंतर तो विनवणी करु लागला, मी चुकून इथे आलो असे तो सांगत होता. त्यावेळी डेअरी मालकाने त्याला जाऊ दिले. पण त्याला संशय आल्याने त्याने दुसऱ्यादिवशी गोठ्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्याला धक्का बसला. रिक्षा चालक गोठ्यातील एका जनावराबरोबर लैंगिक चाळे करत होता. तो लगेच ते सीसीटीव्ही फुटेज टेक्निशिअनकडे घेऊन गेला व ते सर्व फुटेज सीडीमध्ये घेतले. त्यानंतर थेट अशोक गार्डन पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कलम ३७७ अंतर्गत तक्रार नोंदवून आरोपीला अटक केली आहे.