मध्य प्रदेशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजातील केवळ एका नेत्यालाच उमेदवारी दिली आहे. येत्या २५ नोव्हेंबरला मध्य प्रदेशात मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री अरिफ बेग यांना उत्तर भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसने या निवडणुकीत मुस्लिम समाजातील पाच नेत्यांना उमेदवारी दिलीये.
केवळ एकाच नेत्याला उमेदवारी देऊन मुस्लिम समाजातील लोकांना मूर्ख बनवण्याचे काम भाजप करीत असल्याची टीका कॉंग्रेसने केली. भाजपने मात्र धर्माधारित किंवा जातीआधारित राजकारणावर आपला विश्वास नसल्याचे सांगत कॉंग्रेसची टीका फेटाळून लावली. अरिफ बेग यांना उमेदवारी देण्यात आलेल्या उत्तर भोपाळमधून याआधी केवळ १९९२ मध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला होता.
कॉंग्रेसने उत्तर भोपाळमधून अरिफ अकील यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर मध्य भोपाळमधून अरिफ मसूद, रेवामधून अब्दुल माजीद खान, मुदवारामधून फिरोज अहमद आणि जाओरामधून युसूफ कडप्पा यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे.