देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना सरकारसोबतच नागरिकांची देखील चिंता वाढू लागली आहे. करोनावरची लस आल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा जरी मिळाला असला, तरी देशात काही भागांमध्ये पुन्हा करोनाची लाट आल्यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण करोनाच्या संकटातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी, अशीच इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. त्यातच आता मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी करोनापासून लवकर मुक्ती मिळावी, यासाठी पूजा सुरू केली आहे. मात्र, ही पूजा त्यांनी इतर कुठे नसून थेट विमानतळावरच सुरू केली आहे. तसेच, या पूजेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांनी चेहऱ्यावर मास्क देखील घातला नसल्याचं दिसत असल्यामुळे त्यांची ही पूजा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

विमानतळ कर्मचारी देखील पूजेत सहभागी

उषा ठाकूर यांनी इंदोरच्या विमानतळावर देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर पूजा केली. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार यावेळी उषा ठाकूर यांच्यासोबत विमानतळ संचालक आर्यमा सन्यास आणि इतर विमानतळ कर्मचारी देखील उपस्थित होते. याआधी देखील उषा ठाकूर अनेक ठिकाणी विना मास्क दिसल्या आहेत. त्यांना हटकल्यानंतर “मी रोज हवन करते आणि हनुमान चालीसा म्हणते त्यामुळे मला मास्क घालण्याची आवश्यकता नाही”, असं उत्तर त्यांनी दिल्याचं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. यााधी देखील उषा ठाकूर यांनी गायीच्या सुकलेल्या शेणाचा हवन केल्यास घर १२ तास सॅनिटाईज राहातं, असा दावा केला होता. उषा ठाकूर यांचा विमानतळावरचा व्हिडीओ काही नेटिझन्सनी फेसबुकवर शेअर केला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. तसेच, विमानतळावर कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही तिथे पूजा करण्याची परवानगी कशी मिळाली, अशी देखील विचारणा होऊ लागली आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशातल्या एकूण करोना रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्ण असणाऱ्या १० राज्यंपैकी मध्य प्रदेश एक राज्य आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये करोना बाधितांचा आकडा ३ लाख २७ हजार २२० पर्यंत गेला असून ४ हजार लोकांचा आत्तापर्यंत मध्य प्रदेशमध्ये मृत्यू झाला आहे.