भारतात महिला सशक्तीकरणाच्या नावाने कितीही गप्पा झाल्या, तरी देखील अजूनही महिलांना मोठ्या प्रमाणावर अपमान आणि अवहेलना सहन करावी लागत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आज एएनआयने या व्हिडिओमागचं सत्य समोर आणलं आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेवर दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर नवऱ्याच्या नातेवाईकांनी मिळून तिला शिक्षा देण्यासाठी नातेवाईकांना खांद्यावर घेऊन ३ किलोमीटरपर्यंत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समजत आहे.

नेमकं झालं काय?

या प्रकरणी सदर महिलेने पोलीस तक्रार दिली असून या तक्रारीनुसार महिलेने तिच्या नवऱ्यासोबत परस्पर सहमतीने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सदर पीडित महिला दुसऱ्या पुरुषासोबत राहात होती. मात्र, यावर तिच्या आधीच्या नवऱ्याच्या नातेवाईकांना आक्षेप होता. त्यावरून वाद देखील सुरू होते.

 

दरम्यान, या वादातूनच महिलेच्या नवऱ्याच्या नातेवाईकांनी तिचं अपहरण केल्याची तक्रार महिलेनं केली आहे. गेल्या आठवड्यात या नातेवाईकांनी तिचं अपहरण केलं आणि तिची गावातून अशा प्रकारे खांद्यावर नवऱ्याच्या नातेवाईकांना घेऊन धिंड काढण्याची शिक्षा तिला सुनावण्यात आली. या व्हिडिओमध्ये महिलेच्या खांद्यावर एक व्यक्ती बसलेली दिसत असून तिच्या आसपास काही पुरुष मंडळी चित्र-विचित्र हावभाव करून महिलेची टर उडवताना देखील दिसत आहेत. शिवाय, महिलेला हातातील काठीने मारत असल्याचा देखील प्रकार समोर आला आहे.

 

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणाची चौकशी करून ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, महिलांना अशा प्रकारे वागणूक दिली जात असल्याचा सोशल मीडियावर अनेकांकडून निषेध केला जात आहे.