त्यांच्या दूरदृष्टीमुळे मोटेरा स्टेडिअम उभं राहिलं. आज याच मोटेरा म्हणजे सरदार पटेल स्टेडिअमवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. पण या प्रसंगी हे स्टेडिअम ज्यांच्यामुळे उभं राहू शकलं, त्या मृगेश जयकृष्ण यांचा आयोजकांना विसर पडला आहे. मृगेश जयकृष्ण यांनी अवघ्या आठ महिने १३ दिवसांमध्ये या स्टेडिअमची उभारणी केली होती. पण त्यांनाच आज होणाऱ्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
सोमवारी मोटेरा स्टेडिअमवर होणाऱ्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे मला निमंत्रण मिळालेले नाही असे मृगेश जयकृष्ण यांनी सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि गुजरात क्रिकेट असोशिएशनचे ते माजी उपाध्यक्ष आहेत.
नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडिअममध्ये एक लाख १० हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडिअम असल्याचा दावा करण्यात येतो. ३६ वर्षांपूर्वी एका उजाड माळरानावर ६३ एकरमध्ये हे स्टेडिअम बांधण्यात आले.
आणखी वाचा – ‘नमस्ते ट्रम्प’ देशातील सर्वात मोठा सोहळा असेल – पंतप्रधान
७६ वर्षीय मृगेश जयकृष्ण यांच्या पुढाकारातून हे स्टेडिअम बांधण्यात आले. ते स्पोटर्स क्लब ऑफ गुजरातचे अध्यक्ष होते. मोटेरा स्टेडिअमच्या उभारणीसाठी मृगेश जयकृष्ण यांनी त्यावेळचे तत्कालिन मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांची भेट घेतली. स्वत:च्या पक्षातील लोकांचा विरोध पत्करुन माधवसिंह सोलंकी यांनी स्टेडिअम उभारणासाठी जमीन दिल्याची आठवण मृगेश जयकृष्ण यांनी सांगितली.
आणखी वाचा – असा असेल ट्रम्प यांचा 36 तासांचा भारत दौरा
तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झेल सिंग यांनी या स्टेडिअमची पायाभरणी केली. कमीत कमी वेळेत या स्टेडिअमची उभारणी करायची होती, म्हणून गुजरात क्रिकेट असोशिएशनने मजुरांसाठी मैदानातच स्वयंपाक घर बनवले. जेणेकरुन त्यांच्या दुपारच्या व रात्रीच्या जेवणाचा वेळ वाचावा. गुजरात क्रिकेट असोशिएशनचे १२ आणि बीसीसीआयचे सहा वर्ष उपाध्यक्ष राहिलेल्या मृगेश यांना स्टेडिअमच्या उभारणीसाठी काय आवश्यकता असते त्याची त्यांना चांगली माहिती होती. काही भारतीय, एनआरआय आणि सहकारी बँकांकडून पैसा उभा करुन जीसीएने या स्टेडिअमची उभारणी केल्याची आठवण जयकृष्ण यांनी सांगितली.