कृषी व त्याच्याशी निगडित क्षेत्रांबाबत अधिकाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी दर्शवली असून कृषी क्षेत्रातील समस्यांवर प्रभावी उपाय सांगणारा अहवाल पुन्हा सादर करावा, असा आदेश त्यांनी दिला आहे. कृषी क्षेत्राबाबत अधिकाऱ्यांनी जे सादरीकरण केले ते लांबलचक होते व त्यात कुठल्याही समस्येवर ठोस उपाय सुचवणाऱ्या कल्पना मांडल्या नव्हत्या. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी कृषी क्षेत्राबाबत करण्यात आलेल्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली असून पुढील बैठकीत सचिवांच्या गटाने नव्याने सादरीकरण करून अहवाल मांडावा असे म्हटले आहे. कृषी क्षेत्राबाबत ५ जानेवारीला पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्यात आले त्यात कृषी, पशुपालन, मत्स्यपालन व कुक्कुटपालन, खते, पाटबंधारे व ग्रामीण विकास हे सर्व विषय मिळून १७-१८ स्लाइड्स होत्या. पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रातील समस्यांवर उपायासाठी १० सचिवांचा एक गट स्थापन केला होता. इतर क्षेत्रांसाठीही विविध गटांनी त्यांचे अहवाल सादर करतानाच सादरीकरणेही केली आहेत.