अरुणाचल प्रदेशसारख्या सीमेवरील संवेदनशील राज्याचा संपर्क रस्ते व इतर मार्गानी देशाच्या इतर भागाशी प्रस्थापित करण्यास  सरकार प्राधान्य देत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशात त्यांनी शनिवारी ४००० कोटींच्या योजनांचे उदघाटन किंवा पायाभरणी केली त्यावेळी ते बोलत होते.

आयजी पार्क येथे एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग व ऊर्जा या क्षेत्रात अरुणाचलची परिस्थिती सुधारण्याचे आमचे प्रयत्न आहेत. हे राज्य देशासाठी अभिमानास्पद असून देशाची सुरक्षा करणारे ते महाद्वार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्याचा विकास करण्यास सरकार वचनबद्ध आहे. अरुणाचल प्रदेशने नेहमीच देशाला ताकद दिली आहे. लोक एकमेकांचे स्वागत करताना जय हिंद म्हणतात त्यामुळे त्यांच्या देशभक्तीचे कौतुक करण्यासारखेच आहे. अरुणाचल व ईशान्येकडील राज्ये विकसित झाली तरच भारताचा खरा विकास होणार आहे. गेल्या ५५ महिन्यात आपण अरुणाचलला अनेकदा भेट दिली व आज ४००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणीचे कार्यक्रम होत आहेत. राज्यात १३००० कोटींची कामे सुरू  असून आधीच्या राजवटीने या राज्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

होलोंगी येथील ग्रीनफील्ड विमानतळाची पायाभरणी मोदी यांनी केली, त्याचबरोबर लोहित जिल्ह्य़ातील तेझू येथे सुधारित विमानतळाचे उद्घाटन केले.  अरुणाचलातील सेला बोगद्याची पायाभरणी त्यांनी केली. त्यामुळे तवांग खोऱ्यात सर्व हवामानात उपयुक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. अरुणाचल प्रदेशच्या चोवीस तास दूरदर्शन वाहिनीचे उद्घाटन त्यांनी केले.

आधीच्या सरकारांशी विकासाची तुलना

आधीच्या सरकारांशी तुलना करता आमच्या सरकारने अरुणाचल प्रदेशात केलेली कामगिरी लक्षात येईल. एकूण ४४००० कोटी रुपये सरकारने या भागाला दिले असून ही रक्कम यूपीएच्या तरतुदीपेक्षा जास्त आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी सभेत दिली.